Join us

२०० स्क्वेअर फूटच्या खोलीतून बनवला करोडो रुपयांच्या मसाल्याचा ब्रँड, अशी उभी केली २,६०० कोटींची कंपनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 2:22 PM

मसाल्याचा प्रसिद्ध ब्रॅंड 'एव्हरेस्ट' कंपनीचे मालक वाडीलाल शाह या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही.

Business : आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या लहानग्याने अगदी कमी वयातच व्यवसायाचे धडे गिरवले. दक्षिण मुंबईत अवघ्या २०० स्क्वेअर फूटच्या जागेत त्यांचे वडील मसाल्याचे दुकान चालवत असत. बालवयात वडिलांना मदत करणारा तो इवलासा बालक एक दिवस मसाल्यांच्या नामवंत कंपनीचा मालक बनेल, याची साधी कल्पनाही कोणाला नव्हती. आज आपण अशाच एका यशस्वी उद्योजकाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. 

मसाल्याचा प्रसिद्ध ब्रॅंड 'एव्हरेस्ट' कंपनीचे मालक वाडीलाल शाह या नावाला वेगळ्या परिचयाची गरज नाही. लहानपणी आपल्या वडिलांसोबत मसाले विकत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टींची माहिती करून घेतली. त्यावेळेस स्त्रिया मसाले खरेदी त्यांच्या क्वालिटीकडे लक्ष देत नसत. त्या एका गोष्टीची उणीव त्यांना जाणवली. इथून त्यांना कल्पना आली की पूर्ण संपूर्ण मसाला पॅक का तयार करू नये, ज्याचे कॉम्बिनेशन आणि चव नेहमी सारखीच असेल. या कल्पनेला कृतीत उतरवून प्रामाणिकपणे काम करत वाडीलाल शाह पुढे गेले आणि त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला, ज्या ब्रॅंडचं नाव जगभरात आज मोठ्या आदरानं घेतलं जातं.

वाडीलाल शाह यांनी तयार केलेला ब्रँड म्हणजे एव्हरेस्ट मसाले. माउंट एव्हरेस्ट प्रमाणे ख्याती आणि प्रसिद्धी  मिळवून देणारा या मसाल्याचा ब्रँडसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २,५०० कोटींहून अधिक झाली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, एका वर्षात मसाल्यांच्या ३७० कोटी पॅकेट्सची विक्री होते. 

बालवयात घेतले व्यवसायाचे धडे

वाडीलाल शाह यांनी बालवयातच निरनिराळ्या प्रकारचे मसाले बनवायला सुरूवात केली. त्यांनी आपल्या कल्पकतेनं केसरी दूध मसाले बनवले आणि ते आपल्या वडिलांच्या दुकानात विकायला सुरुवात केली. लोकांना ते मसाले आवडले, त्यांनंतर त्यांनी चहा मसालाही बाजारात लाँच केला. त्यासोबतच त्यांनी गरम मसालाही लाँच केला. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. या दरम्यान वाडीलाल शाह यांनाही त्यांच्या व्यवसायात काही कमतरता आढळल्या. त्यांच्या व्यवसायात एकच कमतरता होती आणि ती म्हणजे त्याचा मसाला एकाच दुकानात विकला जात होता. भारत ही मसाल्यांची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शाह देशाच्या विविध भागात फिरले. त्यांनी अनेक प्रकारच्या मसाल्यांची माहिती मिळवली. पण वाडीलाल शाह एवढ्यावरच थांबले नाहीत. १९८० मध्ये त्यांनी व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचं धाडस केलं. मुंबईतील विक्रोळीमध्ये एका मसाले निर्मितीचा कारखाना उभारत त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर अवघ्या ३ वर्षांच्या कालावधीत एव्हरेस्टचं नाव जगभर पसरलं. 

टेलिव्हिजनचा केला पूरेपूर वापर 

वर्तमानपत्रं तसेच जाहिरातींच्या काळात वाडीलाल शाह यांना भन्नाट कल्पना सूचली. त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी त्याचा पूरेपूर वापर झाला. झालं असं की शाह यांनी व्यवसायवाढीसाठी एव्हरेस्ट मसालेची टेलिव्हिजनवर पहिली जाहिरात केली. दूरदर्शनवर चालणाऱ्या या जाहिरातीनं कंपनीचा व्यवसाय नव्या उंचीवर नेला. या जाहिरातीच्या मदतीनं कंपनीचे १,००,००० चहा मसाला पॅकेट्स विकले गेले आणि कंपनी मुंबईत लोकप्रिय झाली. ९.५ टक्के नफा मिळवून कंपनी मसाल्यांच्या बाजारात अव्वल क्रमांकावर पोहोचली. 

कंपनीच्या मसाल्याचा दर्जा इतका मजबूत होता की ९० टक्के ग्राहक ते मसाले पुन्हा पुन्हा विकत घेऊ लागले. ग्राहकांची वाढती मागणी पाहून वाडीलाल यांनी १९९६ मध्ये कुर्ला येथे दुसरा कारखाना सुरू केला. बनवली मसाल्यांच्या प्रसिद्ध ब्रँडची ओळख

२०१७ पर्यंत, एव्हरेस्ट मसालाची विक्री १,५०० कोटी रुपयांची होती. त्याचवेळी कंपनीने गुजरातमधील उंबरगाव येथे आपल्या सर्वात मोठ्या मसाल्याच्या कारखान्याची घोषणा केली. या कारखान्यात दररोज १,०० मेट्रिक टन मसाल्यांचं उत्पादन होतं. त्याचदरम्यान, कंपनीनं बिग बी अमिताभ बच्चन यांना ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं. अभिताभ बच्चन यांच्या जाहिरातींमुळे २०२१ पर्यंत कंपनीची विक्री २,००० कोटी रुपयांच्या पुढे गेली होती. सध्या त्यांची विक्री २,६०० कोटी रुपये इतकी आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानही कंपनीच्या जाहीरातीत झळकला आहे.

टॅग्स :व्यवसाय