नवी दिल्ली - सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून मोठा झटका बसणार आहे. खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गहू, तेल आणि इतर पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत.
रशिया-युक्रेन युद्धामुळेही एफएमसीजी कंपन्यांना धक्का बसला आहे. या युद्धामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलांच्या किंमतींमध्ये वाढ होणार असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे. डाबर आणि पार्लेजी यासारख्या कंपन्यांचे सध्याच्या परिस्थितीवर बारीक लक्ष असून ते महागाईच्या समस्येपासून लढण्यासाठी काही पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. काही अहवालांमध्ये म्हटलंय की हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले या कंपन्यांनी मागील आठवड्यात आपल्या खाद्य उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.
"पामतेलाचा भाव 180 रुपये प्रति लिटर"
पार्ले प्रोडक्टसचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयांक शाह यांनी आम्ही उद्योग क्षेत्राकडून किमतीत 10 ते 15 टक्क्यांची वाढीची अपेक्षा करतो. किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार होत आहे. अशातच किंमतींमध्ये किती वाढ होईल हे आताच सांगणे अवघड आहे. पामतेलाचा भाव 180 रुपये प्रति लिटरवर गेल्याचे त्यांनी सांगितले. आता तो 150 रुपये प्रति लिटरवर आला आहे. त्याचप्रमाणे, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्यानंतर 100 डॉलरवर आली आहे असं म्हटलं आहे. "महागाईच्या दबावामुळे ग्राहकांनी खर्च केला कमी"
डाबर इंडियाचे मुख्य वित्त अधिकारी अंकुश जैन यांनी सांगितले की महागाईचा दर कायम आहे आणि सलग दुसऱ्या वर्षी ही चिंतेची बाब आहे. ते म्हणाले, महागाईच्या दबावामुळे ग्राहकांनी खर्च कमी केला आहे. ते लहान पॅक खरेदी करत आहेत. एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेसचे कार्यकारी उपाध्यक्ष अबनीश रॉय म्हणाले की, एफएमसीजी कंपन्या महागाईचा बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले यांच्याकडे उच्च किंमत निश्चित करण्याची ताकद आहे. कॉफी आणि पॅकेजिंग वस्तूंच्या दरवाढीचा बोजा ते ग्राहकांवर टाकत आहेत. आमचा अंदाज आहे की 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत सर्व एफएमसीजी कंपन्या किमतीत तीन ते पाच टक्क्यांनी वाढ करतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.