- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २०२३-२४ या वर्षाचे बजेट १ फ्रेब्रुवारीला लोकसभेत सादर होईल. असे म्हणतात की, प्रत्येकाने बजेटमध्येच राहावे. असे का?
कृष्णा (काल्पनिक पात्र) : अर्जुन, सरळ सोप्या भाषेत बजेट म्हणजे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजित उत्पन्न व खर्च यांचे बनविलेले पत्रक. या पत्रकाच्या आधारे शासनाचे कार्य केले जाते. प्रत्येकानेच असे बजेट केले, तर ऐनवेळच्या अडचणी टाळता येतात.
अर्जुन : कृष्णा, बजेटचे प्रकार कोणते?
कृष्णा : अर्जुन, बजेटचे विविध प्रकार म्हणजे वैयक्तिक बजेट, झिरो बजेट, परफॉर्मन्स बजेट, रेव्हेन्यू बजेट, कॅपिटल बजेट, कॅश बजेट, इत्यादी. या प्रकारातून मुख्य तीन भाग आपण करू शकतो, ते म्हणजे फॅमिली बजेट, व्यवसायाचे बजेट, देशाचे किंवा राज्याचे बजेट.
अर्जुन : कृष्णा, प्रत्येकाने फॅमिली बजेट का बनवावे?
कृष्णा : अर्जुन, आजच्या युगात प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन खर्च, आकस्मिक खर्च, मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपण... इत्यादी अनेक गाेष्टींसाठी खर्च करावा लागतो. प्रत्येक कुटुंबाने आपले राहणीमान व उत्पन्नानुसार प्रत्येक वर्षासाठी व त्यावरून मासिक बजेट तयार करायला हवे. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस त्या महिन्याचे अनुमानित बजेट व प्रत्यक्ष झालेला खर्च तपासावा. त्यानुसार पुढील महिन्याच्या बजेटमध्ये फेरफार करावा. यामुळे उत्पन्न व खर्च याचा समतोल बसविता येऊ शकेल, आर्थिक नियोजन होईल व घरांत शांतता नांदू शकेल.
अर्जुन : कृष्णा, व्यवसाय बजेटचे काय महत्त्व आहे?
कृष्णा : अर्जुन, जर व्यवसायात प्रगती करायची असेल तर त्याला ‘टार्गेट’ ठरवावे लागतात व ते साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्यासाठी बजेट आवश्यक आहे.
अर्जुन : कृष्णा, या बजेटमधून काय बोध घ्यावा?
कृष्णा : अर्जुन, बजेटमध्ये राहणे म्हणजेच संतुलित जीवन जगणे. याचा अर्थ असा की, प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसारच पैसा खर्च करावा. उत्पन्न पाहूनच संसार वा व्यवसाय चालवावा. कर्जाचे प्रमाण सिमित ठेवावे. घर, व्यवसाय आणि देश चालविण्यासाठी बजेट हा एक उत्तम पर्याय आहे. देशाचे बजेट शासनाच्या हातात आहे. मात्र, आधी स्वत:त सुधारणा केल्यास देशाची सुधारणा होईल.
प्रत्येकाने आपल्या ‘बजेट’मध्ये राहावे!
Budget : २०२३-२४ या वर्षाचे बजेट १ फ्रेब्रुवारीला लोकसभेत सादर होईल. असे म्हणतात की, प्रत्येकाने बजेटमध्येच राहावे. असे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:17 AM2023-01-30T10:17:02+5:302023-01-30T10:17:23+5:30