Join us

महाग असले तरी प्रत्येकाला स्वत:चेच घर हवे! सणासुदीत होणार २ लाख घरांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 9:28 AM

किमती ११% वाढूनही विक्री ३६% वाढली

नवी दिल्ली : आपल्या हक्काचे, स्वत:च्या मालकीचे एकतरी घर असावे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी कितीही अडचणी आल्या तरी, जो-तो प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. सध्या हेच चित्र दिसत आहे. घरांच्या किमती वाढल्या असल्या तरी शहरांमध्ये त्यांची खरेदी घटण्याऐवजी वाढलेली दिसत आहे.

जून ते सप्टेंबर या काळाचा विचार केला असता घरांच्या किमती ११ टक्क्यांनी वाढलेल्या असताना त्यांची विक्री मात्र ३६ टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबर तिमाहीतील घरांच्या विक्रीची हा विक्रम आहे. रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्म एनारॉकने जारी केलेल्या अहवालानुसार सप्टेंबर तिमाहीत १,२०,२८० घरांची विक्री झाली. मागील वर्षी याच कालखंडात ही विक्री ८८,२३० इतकी होती.

यंदाच्या सणासुदीच्या कालखंडात देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

२.१५ नव्या हाउसिंग प्रकल्पांची सुरुवात विविध शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे या सणासुदीच्या हंगामात. मागच्या वर्षी याच हंगामात १.८७ लाख नव्या हाउसिंग प्रकल्पांना सुरुवात झाली होती.

२-२.२५ लाख घरे विकली जाण्याची शक्यता आहे या सणासुदीच्या हंगामात. २०२२ च्या हंगामात १.८४ लाख घरांची विक्री झाली होती.

२.५० लाख पेक्षा अधिक घरांची विक्री होऊ शकते. जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या सहामाहीत. २०२३ च्या जानेवारी ते जूनच्या पहिल्या सहामाहीत १.५० लाख घरांची विक्री झाली आहे.

१,२०,२८० घरे विकली गेली २०२३ च्या जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत. या संपूर्ण वर्षात देशभरात शहरांत ४ लाखांहून अधिक घरे विकली जाण्याची शक्यता आहे.

सणासुदीमुळे मिळेल बूस्टर

येत्या काही दिवसात जिकडे-तिकडे नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांचा उत्साह दिसणार आहे. सणांचा हा काळ घरखरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो. संपूर्ण वर्षभराच्या तुलनेत या हंगामात २५ टक्के घरांची विक्री होत असते.

सध्या प्रॉपर्टी बाजार वेगाने वाढत आहे. ही वाटचाल पुढेही चालू राहील, असा अंदाज आहे. या हंगामातच २ लाखहून अधिक घरांची विक्री होईल, असा अंदाज आहे.

सणासुदीच्या काळात अनेक बिल्डर सवलतीच्या आकर्षक योजना जाहीर करीत असतात. याचाही लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

घरांची विक्री वाढण्यामागे नेमकी कारणे कोणती?

मागच्या पाच महिन्यात गृहकर्जाच्या दरात कोणताही वाढ झालेली नाही. त्यामुळे कर्ज काढून घरे घेण्याकडे लोकांचा कल दिसत आहे.

लोकांची मिळकत वाढल्याने घरखरेदीचे प्रमाण वाढले आहे. यात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने वाढलेले दिसत आहे.