नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर तूर्त तरी कमी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशाच्या अनेक भागात इंधन दर १०० रुपयांच्या वर गेल्यामुळे उत्पादन शुल्कात कपात करून नागरिकांना दरवाढीपासून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी वरील वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, आधीच्या संपुआ सरकारने इंधन दरात कपात केली होती, हे खरे असले तरी त्यासाठी त्यांनी १.४४ लाख कोटी रुपयांचे तेल रोखे काढले होते. या रोख्यांचा बोजा आता आमच्या सरकारवर आला आहे. त्यामुळे आम्ही पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करू शकत नाही.
पाच वर्षांत भरले ७०,१९५ कोटी व्याज
सीतारामन यांनी सांगितले की, इंधन दरात कपात करण्यात आल्यामुळे जे नुकसान झाले, ते भरून काढण्यासाठी संपुआ सरकारने सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांना रोखे जारी केले होते. हे रोखे आणि त्यावरील व्याज आता फेडले जात आहे.
७०,१९५.७२
कोटी रुपये मागील पाच वर्षांत सरकारने व्याजापोटी भरले आहेत. तेल रोख्यांचे हे ओझे नसते, तर मी नक्कीच उत्पादन शुल्क कपात करू शकले असते.