जयदीप दाभोळकर
व्हॉट्सॲप हे आयुष्याचा अविभाज्य भाग झालेलं आहे. व्हॉट्सॲपच्या सहाय्यानं जगातील कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीसोबत मेसेज, कॉलिंग आणि व्हिडीओद्वारे संपर्कात राहू शकतो. इतकंच काय तर व्हॉट्सॲप आता याच्याही पलिकडे गेलंय. याद्वारे आता कोणत्याही वस्तूची खरेदी विक्री करणं सोपं झालंय. व्हॉट्सॲप बिझनेसद्वारे देशभरातील अनेक छोटे-मोठे व्यवसायिक आता लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचू लागलेत. याच पार्श्वभूमीवर मेटा इंडियाचे बिझनेस मेसेजिंग डायरेक्टर रवी गर्ग यांनी 'लोकमत मनी'शी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळेपणानं उत्तरं दिली.
व्हॅाट्सॲप बिझनेस कसं काम करतं? त्याचा सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना फायदा काय होतो?
आपला दिवसही व्हॉट्सॲपच्या मदतीनं सुरू होतो आणि संपतोही त्याच्याच मदतीनं. तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. सर्वांशीच तुम्ही याद्वारे संपर्कात राहू शकतात. असं असताना एखादी व्यक्ती आणि एखादा व्यवसायदेखील एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात असा विचार आमच्या मनात आला. सध्या डिजिटलचा जमाना आहे. पण सर्वच बेवसाईट, ॲप्सपर्यंत सर्वांनाच पोहोचता येत नाही. केवळ एक 'हाय' असा मेसेज केल्यानंतर तो बिझनेस तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि तुम्हाला एका क्लिकवर तुमची आवडती वस्तू घेता यावी, हा यामागचा उद्देश होता.
लहान दुकानांपासून ते मोठ्या बिझनेपर्यंत सर्वांनीच ग्राहकांशी कनेक्ट व्हावं आणि ग्राहकांनाही त्याचा लाभ घेता यावा, या विचारातून हा प्रवास सुरू झाला. जर तुमच्या घरातली एखादी वस्तू खराब झाली, तर तुम्ही संबंधित कंपनीला फोन कराल, त्यानंतर तुमची कंम्प्लेंट घेतली जाईल. पण कोणत्याही कॉल सेंटरला कॉल करण्याऐवजी तुमच्याकडे जर तुमचं डिव्हाईस ज्या कंपनीचं आहे त्यांच्या व्हॉट्सअप नंबर 'Hi' पाठवलं आणि त्यांचा सर्व मेन्यू तुमच्यासमोर ओपन झाला, तुमची थेट कंप्लेंट घेतली आणि तुम्हाला सातत्यानं त्याच्या अपडेट मिळत राहिल्या, हे सर्व काम तुमचं मिनिटांत होऊन जाईल.
व्हॅाट्सॲप बिझनेसचा विस्ताराचा काय प्लॅन आहे? भविष्यात सर्वसामान्यांच्या काही योजना आहे का?
अनेकजण ट्रेन, बस, मेट्रोनं प्रवास करतात. आम्ही दिल्ली मेट्रोसोबतच तिकिटांची सेवा सुरू केली आहे. यासाठी त्यांच्या नंबरवर केवळ 'Hi' असा मेसेज केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेन्यू ओपन होतो. त्यानंतर अवघ्या मिनिटांत त्या मेन्यूतून तुम्ही तुमचं मेट्रोचं तिकिट काढू शकता. यासाठी कोणत्याही रांगेत राहण्याची गरज नाही किंवा उन्हातान्हात फिरण्याचीही गरज नाही, कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही तिकिट काढू शकता. सध्या अनेक मेट्रोंसोबत आमची चर्चा सुरू आहे, मुंबई मेट्रोसोबतची आमची चर्चा सुरू आहे, लवकरच या सेवांचाही लाभ व्हॉट्सअॅपद्वारे सामान्यांना घेता येईल. याशिवाय आमची मुंबई लोकल रेल्वेसाठीही चर्चा सुरू आहे. परंतु त्यांची स्वत:चीही सेवा आहे, ही सेवा सुरू करावी का हा निर्णय त्यांचा असेल. डॉक्टरांची अपॉईंटमेंट असो किंवा तुम्हाला कोणत्याही सेवा घ्यायच्या असतील एका क्लिकवर त्यांचाशी संपर्क करता येईल.
लहान व्यवसायिकांनाही त्यांच्या व्यवसायासाठी लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. आपलं स्वत:चं ॲप किंवा वेबसाईट तयार करणं त्यांच्यासाठी तितकं सोपं नाहीये. लहान व्यवसायिकांकडे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवर आपले प्रोडक्ट लिस्ट करून त्याची विक्री करण्याचा एक पर्याय आहे किंवा त्यांच्याकडे कोणतीही डिजिटल स्ट्रॅटजी नसेल. व्हॉट्सवर व्यावसायिकांना त्यांचं स्वत:चं शॉप तयार करता येतं. यामध्ये ते त्यांचे प्रोडक्ट, किंमती सर्वकाही ठेवू शकतात, पेमेटचीही सोय याचद्वारे करू शकतात आणि देशातील काय तर जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतात. इतकंच काय आम्ही त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी क्लिक टू व्हॉट्सॲप ही सेवाही सुरू केली आहे. याद्वारे ते फेसबुकवर त्यांची जाहिरातही करू शकतात. या जाहिरातीवर कोणी क्लिक केलं की ते थेट संबंधिताच्या व्हॉट्सॲपवर जाऊन प्रोडक्ट पाहू शकतात.
व्हॅाट्सॲप बिझनेसमुळे सर्वाधिक फायदा झालाय असं उदाहरण सांगू शकाल का?
अशा अनेक लहान मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांना या सेवेचा मोठा फायदा झालाय. एक महिलांच्या कपडे विकणारी कंपनी आहे. यामध्ये तर त्यांनी तुमचा सेल्फी पाठवून तुम्ही ट्रायलही घेऊ शकता अशीही सुविधा सुरू केली आहे. त्यांनी यात एआय टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांची एंगेजमेंट ६५ टक्क्यांनी वाढली. इतकंच काय तर रॉयल एन्फिल्डनं नवी बाईक लॉन्च केल्यानंतर पहिल्यांदाच व्हॉट्सॲपवर कॅम्पेन लाँच केलं आणि त्यांना एका दिवसात ६ लाखांपेक्षा अधिक टेस्ट राईडच्या रिक्वेस्ट मिळाल्या.
टियर २, टियर ३ ठिकाणांसाठी काय विचार आहे?
टियर २, टियर ३ मध्ये महत्त्वाचं म्हणजे हे सुरू कसं करायचं, कॅटलॉग कसा तयार करायचा याचं प्रशिक्षण देणं महत्त्वाचं वाटतं. यासाठी आम्ही अनेक संस्थांशी टायअप केलं आहे. ट्रेडर्स असोसिएशनशीही आम्ही टायअप केलंय, यामध्ये त्यांच्या माध्यमातून १ कोटी ट्रेडर्सना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. सरकारच्या ओएनडीसीशीदेखील आम्ही टायअप केलंय. यामध्ये जे कोणीही मर्चट येताहेत त्यांनाही आम्ही ट्रेनिंग देतोय.
जगातील २० कोटींपेक्षा अधिक छोटे व्यवसाय व्हॉट्सॲपवर आहेत आणि त्यापैकी मोठा वाटा भारताचा आहे. सध्या याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात वाढतही आहे. आम्ही व्यवसायांना व्यासपीठ देण्याचं काम करत आहोत आणि सर्वांसाठी ही प्रोसेस सोपी करण्याचा प्रयत्न करत आहोत.
सर्वसामान्यांना या सेवांसाठी काही चार्जेस भरावे लागणार का?
सध्या आमच्या महसूलाचा एक भाग हा त्यावरच्या जाहिरातींमधून येतो आणि दुसरा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या माध्यमातून येतो. सर्वसामान्यांकडून आम्ही कोणतेही चार्जेस घेत नाही. सध्या असा कोणताही विचारही नाही.
सध्या एआयचा बोलबाला आहे, व्हॅाट्सॲप बिझनेसमध्ये त्याचा वापर होणार का?
सध्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या एआयचा वापर करत आहेत. पण अशात लहान व्यवसायांचं काय असा प्रश्न होता. आम्ही त्यांच्यासाठी एआय एजंट लॉन्च केलाय. यामध्ये एआय ग्राहकांशी संवाद साधेल आणि ग्राहकांना आवश्यक ती माहिती मिळेल. यासाठी ज्याचा व्यवसाय आहे त्यांना केवळ त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती देऊन त्या एआयला ट्रेन करावं लागणार आहे. यानंतर ते एआय ग्राहकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल.