Raymond Nawaz Modi vs Gautam Singhania : गेल्या काही काळापासून रेमंड समुहातील वाद सर्वांसमोर आले आहेत. रेमंड समुहातील तीन कंपन्यांच्या वादादरम्यान आता नवाज मोदी यांना संचालक मंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी झालेल्या ईजीएममध्ये नवाज मोदी यांना जेके इन्व्हेस्टर्स लिमिटेड (JKI), रेमंड कन्झुमर केअर (RCCL) आणि स्मार्ट अॅडव्हायझरी अँड फिनसर्व्हच्या संचालक मंडळातून बाहेर करण्याचा निर्णय झाला. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
नवाज मोदी यांना जून २०१५ मध्ये जेके इन्व्हेस्टर्स लिमिटेड (JKI), डिसेंबर २०२० मध्ये रेमंड कन्झुमर केअर (RCCL) आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये स्मार्ट अॅडव्हायझरी अँड फिनसर्व्हमध्ये संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड कंपनी रेमंडनं आतापर्यंत नवाज मोदी यांना संचालक मंडळातून बाहेर काढण्याचा प्रस्ताव ठेवलेला नाही, परंतु लवकरच ते तसंही करू शकतात.
काय म्हणाल्या नवाज मोदी?
संचालक मंडळातून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर नवाज मोदी यावर प्रतिक्रिया दिली. "जेव्हापासून मी गौतम सिंघानिया यांच्या गैरकृत्यांना समोर आणत आहे, तेव्हापासून मला वाईट वागणूक दिली जात आहे. आधी मारहाण केली आणि आता कंपनीतून काढूनही टाकलं," असं त्या म्हणाल्या.
यापूर्वी जेके इनव्हेस्टर्स आणि स्मार्ट अॅडव्हायझरीच्या शेअरहोल्डर्सनं कंपनीला पत्र लिहित, संचालकाच्या रुपात त्यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं होतं. तसंच शेअरहोल्डर्सनं नवाज मोदी यांना संचालक मंडळातून हटवण्यासाठी मीटिंग बोलावण्याची मागणी केली होती. आता कायदेशीर मार्गानं नवाज मोदी यांना संचालक मंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.