Join us

व्याजदरात कपात करण्याची उद्योग क्षेत्राला अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 3:18 AM

महागाईचा पारा खाली आल्यामुळे आगामी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात करायला हवी, अशी अपेक्षा भारतीय उद्योगजगतातून व्यक्त होत आहे.

नवी दिल्ली : महागाईचा पारा खाली आल्यामुळे आगामी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात करायला हवी, अशी अपेक्षा भारतीय उद्योगजगतातून व्यक्त होत आहे.सप्टेंबरमध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर घसरून २.६० टक्क्यांवर आला आहे. खाद्यवस्तूंच्या विशेषत: भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई खाली आली आहे. या पार्श्वभूमीवर धोरणात्मक व्याजदरात कपात करण्याची मागणी उद्योग क्षेत्राकडून करण्यात आली आहे. फिक्कीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी सांगितले की, पतधोरणाकडे पाहण्याचा सध्याचा आपला दृष्टिकोन हा प्रामुख्याने महागाईचे व्यवस्थापन करण्यापुरताच मर्यादित आहे.त्यात बदल व्हायला हवा, असे आम्हाला वाटते. आपल्या पतधोरणात व्यापक संतुलनाची गरज आहे, असे आमचे मत आहे. औद्योगिक क्षेत्राला जेव्हा पाठबळाची गरज असते, तेव्हा रिझर्व्ह बँकेने अधिक संतुलित दृष्टिकोन ठेवायला हवा, अशी आमची विनंती आहे. या टप्प्यावर आपल्याला समावेशक पतधोरणाची गरज आहे. रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करील, अशी आम्हाला आशा वाटते.उद्योग संघटना सीआयआयने म्हटले की, किरकोळ आणि घाऊक, अशा दोन्ही क्षेत्रांतील महागाईचा पारा उतरला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पुढील आढाव्यात धोरणात्मक व्याजदर कमी करायला हवेत. मागणीला चालना देण्यासाठी दरकपात आवश्यक आहे.४ आॅक्टोबर रोजी जाहीर झालेल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ स्थितीत ठेवले होते. महागाई वाढण्याची भीती, तसेच वृद्धीदरातील घसरण यामुळे व्याजदर कपात करण्याचे रिझर्व्ह बँकेने टाळले होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक