प्रसाद गो. जोशी,
नवी दिल्ली-संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये वस्तू आणि सेवा विधेयकाच्या (जीएसटी) मंजुरीचा मार्ग प्रशस्त होण्याच्या अपेक्षेने बाजारात मोठ्या प्रमाणावर आशादायक वातावरण होते. घाऊक निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरामध्ये झालेली वाढ अर्थव्यवस्थेच्या सुदृढ प्रकृतीचे लक्षण मानले जात असल्यानेही बाजाराच्या निर्देशांकांमध्ये वाढ झालेली दिसून आली.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात शुक्रवारचा अपवाद वगळता तेजीचेच वातावरण दिसून आले. शुक्रवारी युरोपियन बाजारामध्ये असलेल्या मंदीचा तसेच जीएसटीबाबतच्या अनिश्चिततेचा फटका बसला. यामुळे बाजार खाली आला. असे असले तरी सप्ताहाचा विचार करता बाजाराचा संवेदनशील निर्देशांक मागील बंद निर्देशांकापेक्षा (२७,१२६.९०) सुमारे ७१० अंशांनी वाढून २७,८३६.५० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २१८.२० अंशांनी वाढून ८५४१.४० अंशांवर बंद झाला. बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांपैकी मेटल निर्देशांक सर्वाधिक आठ टक्क्यांनी वाढला.
संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मांडून मंजूर केले जाण्याची शक्यता वाढती असल्यामुळे गतसप्ताहामध्ये बाजारात उत्साहाचे वातावरण होते. कॉँग्रेस आणि भाजपामध्ये या विधेयकावरून मतैक्य होण्याच्या वृत्तांमुळे बाजार तेजीत दिसून आला.
मागील सप्ताहामध्ये विक्री करीत असलेल्या परकीय वित्त संस्थांनी या सप्ताहात मात्र जोरदार खरेदी केली. या संस्थांनी सप्ताहामध्ये ३,२३५.१६ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपया ३९ पैशांनी वाढला. या सर्वच बाबींमुळे बाजार वाढला. शुक्रवारी युरोपमधील बाजार मंदीत असल्याने त्याचा प्रभाव भारतीय बाजारावर पडून निर्देशांकामध्ये घट झालेली दिसून आली. मात्र हा प्रभाव तत्कालिक असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.
वर्षभरापूर्वी उणे असणारा घाऊक किमतींवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक सलग तिसऱ्या महिन्यामध्ये वाढला आहे.
फळे, भाज्या आणि अन्नधान्याच्या किमतींमधील वाढीमुळे जून महिन्यात हा निर्देशांक १.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधीच्या (मे) महिन्यात तो ०.७९ टक्के होता. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्याने महागाईवर काहीसा अंकुश येण्याची शक्यता आहे.
गतसप्ताहामध्ये क्वेस कॉर्पाेरेशनच्या समभागांची
नोंदणी मुंबई शेअर बाजारात झाली. या नोंदणीच्या वेळी या समभागांचे मूल्य बरेच वाढलेले होते. त्याचप्रमाणे एल अॅण्ड टी इन्फोटेकच्या
प्रारंभिक भाग विक्रीस मोठा
प्रतिसाद लाभला. यावरूनही आगामी काळात बाजारात तेजी येण्याचे
संकेत मिळत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.
>आठवड्यातील घडामोडी
जीएसटी विधेयकाचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा
घाऊक निर्देशांकावा आधारित चलनवाढीच्या दरामध्ये सलग तिसऱ्या महिन्यामध्ये वाढ परकीय वित्त संस्थांनी
केली बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी
बाजारात क्वेस कॉर्पाेरेशनच्या समभागांची नोंदणी मोठ्या प्रीमियमसह
लार्सन अॅण्ड टुब्रो इन्फोटेकच्या प्रारंभिक विक्रीला मोठा प्रतिसाद