नवी दिल्ली - टोमॅटोचे वाढलेले दर घसरले असले तरी आता साखरेचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मागे लागलेले महागाईचे दुष्टचक्र काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. खाण्या-पिण्याच्या वस्तू, शिक्षण आणि आरोग्य उपचारांवर होणारा खर्च वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
मुलांच्या शिक्षणावर वाढलेला खर्च, महागलेला आरोग्यावरील उपचारांचा खर्च, नोकरी जाण्याची सततची चिंता, यामुळे नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य खराब होत चालले आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेता केंद्र सरकारने कोठारातून धान्यपुरवठा वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.
सणासुदीचा काळ लक्षात घेता बाजारात अन्नध्यान कमी पडणार नाही याची दक्षता सरकारला घ्यावी लागणार आहे. शेती उत्पन्न घटल्यास निर्माण होणाऱ्या स्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली पाहिजे.
शेती उत्पादनाला फटका बसण्याची चिंता
यंदा देशात मान्सूनमध्ये मोठी घट झालेली दिसते. अनेक भागात पाण्याची स्थिती सप्टेंबरमध्येच भीषण झालेली आहे. त्यामुळे या खरीप हंगामात झालेल्या पेरण्यांमध्ये ८.५८ टक्के घट झाली आहे. सध्या ११९.९१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या.
कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार तांदळाची लागवड यंदा ४०३.४१ लाख हेक्टवर झाली आहे. मागच्या वर्षी हेच क्षेत्र ३९२.८१ लाख हेक्टर इतके होते.
पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. सिंचनाखाली असलेले कपाशी, केळी या पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी कपाशीची फुले, पाती गळू लागली आहेत. यामुळे शेती उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.
भेडसावत आहे कोणकोणत्या चिंता?
वाढती खाद्य महागाई ६०%
वाढता आरोग्य खर्च ३६%
वाढता शिक्षण खर्च ३५%
जागतिक मंदीचा प्रभाव २७%
बिघडलेले आरोग्य २४%
नोकरी जाण्याची चिंता २३%
कसलाही इन्शुरन्स नाही १९%
(स्रोत : फायनान्शिअल इम्युनिटी स्टडी, एसबीआय एबीआय लाइफ इन्शुरन्स)
५९ % नागरिक देशातील खाद्य महागाईमुळे त्रस्त आहेत.
४३ % नागरिक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू महागल्याने चिंतेत आहेत.
डाळींची आयात केंद्र सरकारने वाढविली
- बाजारातील डाळींचा पुरवठा वाढवण्याच्या दिशेने पावले उचलू शकते.
- आधीच सरकारने डाळींच्या साठ्यावर निर्बंध घातले आहेत.
- सणासुदीचे दिवस पाहता सरकार आपल्या साठ्यातून डाळींचा पुरवठा वाढवू शकते.
- पुरवठ्यावर ताण येऊ नये यासाठी सरकारने कॅनडातून मसूर, आफ्रिकी देशांमधून तूर मागवणे सुरू केले.
- देशांतर्गत उत्पादन घटण्याच्या भीतीने कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातून डाळींची आयात सुरू केली आहे.
- १० % इतक्या महाग झाल्या मागील एका महिन्यात डाळी
- १५ % महाग झाले मागील एका महिन्यात मसाल्याचे पदार्थ