नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, सीएनजी, पीएनजीने महागाईचा कळस गाठल्यानंतर आता वीजही महाग होणार आहे. वाढता उकाडा आणि उद्योगात तेजी आल्याने देशात विजेच्या मागणीत ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे खरेदीची किंमत १३ वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे.
इंडियन एनर्जी एक्स्चेंजवर विजेची सरासरी किंमत वाढून ८.२३ रुपये प्रतिकिलोवॉट तास (एमयू)वर पोहोचली आहे, जी मार्च २०२१ मध्ये ४.२० रुपये प्रतिएमयू होती. २००९ नंतर ही सर्वात अधिक खरेदी किंमत आहे. महाग वीज खरेदी करावी लागत असल्याने वीज वितरण कंपन्या त्याचा बोझा ग्राहकांवर लादू शकतात. सध्या तरी वीज कंपन्यांनी तात्काळ दरवाढीचे संकेत दिले नसले तरी मागणी वाढल्याने भारनियमन लागण्याची शक्यता आहे.
देशावर कोळसा संकट
देशात विजेची मागणी वाढली असताना भारतात सलग दुसऱ्या वर्षी कोळसा पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. कोल इंडियाने यामुळे औद्योगिक कंपन्यांच्या कोळसा पुरवठ्यावर निर्बंध आणले असून, वीज प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे.
सरकारी मालकीच्या खाण कंपन्यांनी उद्योगांना दैनंदिन पुरवठा २७५,००० टनांपर्यंत मर्यादित केला. हे प्रमाण १७ टक्क्यांनी कमी आहे. कोळसा आयातही महाग झाल्याने अनेक उद्योजक चिंतित आहेत.
उद्योग क्षेत्रात विजेचा वापर १६%वाढण्याची शक्यता
भारनियमनाची शक्यता
८५%वाढली विजेची किंमत (फेब्रुवारी २०२२च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये)
यंदा वीज वापराचा अंदाज
१,६५१ अब्ज युनिट विजेच्या वापरात गेल्या वर्षाच्या तुलनेत
२२% वाढ
उन्हाच्या झळांनी मागणीत वाढ
मार्चमध्ये उन्हाच्या झळा लवकर सुरू झाल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जुलैपर्यंत या झळा कायम राहणार आहेत.