विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन आठवड्यांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. बुधवारी सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते ५२ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. युद्ध सुरूच राहिले, तर सोने ५५ हजारांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे गुढीपाडव्यापूर्वी सोने-चांदी खरेदी फायद्याचे ठरणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
बुधवारी चांदीच्याही भावात दोन हजार रुपयांनी वाढ होऊन ६८ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. पुढच्या काळात चांदी ७५ हजारांपर्यंत पोहोचू शकते. लॉकडाऊन काळात सोने-चांदीत झालेली भाववाढ आता पुन्हा एकदा होऊ लागली आहे.
दोन आठवड्यांत सोने १,९०० रुपयांनी वधारले
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. दोन आठवड्यांत सोन्यात १,९०० रुपयांनी तर चांदी थेट पाच हजार रुपयांनी वाढली आहे. चांदीत सात महिन्यांतील हा उच्चांकी भाव आहे.
युद्धामुळे सोने-चांदीच्या आयातीवर परिणाम होत असून, भावात वाढ होत आहे. युद्ध सुरू राहिले व जास्त हानी झाली, तर सोने ५५ हजार तर चांदी ७५ हजारांपर्यंत जाऊ शकते. गुढीपाडवा व अक्षयतृतीयेपर्यंत भाव वाढण्याची शक्यता असल्याने, त्यापूर्वी खरेदी फायद्याची ठरेल. - स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन
आजघडीला मुंबईत सोन्याचा भाव प्रतितोळा ५२ हजार ५०० आहे. युद्ध असेच सुरू राहिले, तर त्याचा फटका सोन्यालाही बसेल. सोन्याच्या भावात वाढ होईल. गुढीपाडव्याला सोन्याचा भाव प्रतितोळा ५५ हजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आता सोन्यामध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील. - कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन