Join us

एअरटेलसह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, वाढवलं टार्गेट प्राईज; करू शकतात मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:26 PM

पाहा कोणते आहेत हे शेअर्स आणि किती आहे टार्गेट प्राईज.

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमधील वाढीव मूल्यांकनामुळे काही प्रमाणात बाजार खाली येण्याची शक्यता असल्यानं येत्या सप्ताहात सेन्सेक्स ८० हजारांचा टप्पा पार करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. भारतात वाहन विक्री आणि पीएमआयची आकडेवारी, फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांचे भाषण याच्या जोडीलाच परकीय वित्त संस्था आणि देशांतर्गत वित्तसंस्थांची कामगिरी याकडेही नजर आहे. आगामी अर्थसंकल्पामुळे ठराविक क्षेत्रांमध्ये तेजी वा मंदी राहू शकते. अशा स्थितीत तज्ज्ञ काही शेअर्सवर बुलिश दिसून येत आहे.

अल्ट्राटेक, भारती एअरटेल, गोदरेज प्रॉपर्टिजच्या शेअरवर एक्सपर्ट बुलिश दिसून येत आहेत. मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं या शेअर्सचं टार्गेट प्राईज वाढवलं असून त्याला बाय रेटिंग दिलंय.

अल्ट्राटेक - अल्ट्राटेकच्या शेअरला ब्रोकरेजनं १३३०० रुपयांच्या टार्गेट प्राईजसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही किंमत सध्याच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक आहे. अल्ट्राटेक सिमेंट प्रमुख बाजारपेठांमधील दीर्घकालीन विस्तार धोरणासह भारतीय सिमेंट उद्योगात आपले अग्रगण्य स्थान कायम ठेवत आहे. यूटीसीईएमची देशांतर्गत ग्रे सिमेंट क्षमता सीएजीआर आर्थिक वर्ष २०१४-२४ मध्ये १० टक्के होती. परंतु आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत २६ टक्क्यांपर्यंत झाल्याचं ब्रोकरेजनं म्हटलंय.

भारती एअरटेल - ब्रोकरेजनं भारती एअरटेलला १६४० रुपयांचं टार्गेट प्राईज देत खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. ही किंमत सध्याच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक आहे. स्पेक्ट्रम लिलावातून दूरसंचार विभागाला ११३.४ अब्ज रुपये मिळाले आहेत. भारती एअरटेलनं ९००/१८००/२१०० मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी बँडमध्ये ९७ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम ६,८५७ कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. भारती एअरटेलला बाजारातील हिस्सा वाढ, सुधारित एआरपीयू, टॅरिफ वाढ आणि नॉन-वायरलेस सेगमेंटमुळे फायदा होण्याची शक्यता असल्याचं ब्रोकरेजनं म्हटलंय.

गोदरेज प्रॉपर्टीज - गोदरेज प्रॉपर्टीजला ब्रोकरेजनं ३६०० रुपयांचं टार्गेट प्राईज देत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही किंमत सध्याच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक आहे. मागणीचं उत्तम वातावरण पाहता मीडियम टर्ममध्ये व्यवस्थापनाला सातत्यपूर्ण वाढ करण्याचा विश्वास आहे. पुणे, बंगळुरू आणि इतर बाजारपेठेतील योगदानात पुढे जाऊन लक्षणीय सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचंही ब्रोकरेजनं म्हटलंय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक