Join us

जीएसटीपूर्वी सेलचा धमाका

By admin | Published: June 16, 2017 3:23 AM

देशभर सेवा व वस्तू कर म्हणजेच जीएसटी लागू व्हायला १५ दिवस शिल्लक असले तरी सध्या ग्राहकांना आनंदाची बातमी आहे. जीएसटी सुरू होण्याच्या आधी मोठ्या

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभर सेवा व वस्तू कर म्हणजेच जीएसटी लागू व्हायला १५ दिवस शिल्लक असले तरी सध्या ग्राहकांना आनंदाची बातमी आहे. जीएसटी सुरू होण्याच्या आधी मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, मोबाइल, मोबाइल अ‍ॅक्सेसरिज, चपला या वस्तूंच्या खरेदीवर दुकानांमध्ये तसेच आॅनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर भरघोस सूट दिली जाते आहे. दुकानदार शिल्लक असलेल्या मालावर कमी नफा घेत आहेत. जीएसटी १ जुलै रोजी लागू झाल्यानंतर कराच्या दरात वाढ होईल. शिवाय जीएसटी लागू झाल्यावर दुकानांत आधी शिल्लक असलेल्या सामानाच्या हिशेबाचे कागदोपत्री बरेच व्यवहार करावे लागतील. त्यात अनेक गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टी टाळण्यासाठी दुकानांमध्ये तसेच आॅनलाइन शॉपिंग साइट्सवर स्टॉक क्लीअरिंग सेल सुरू झाला आहे. दुकानांमध्ये सुरू असलेल्या स्टॉक क्लीअरिंगमध्ये एअर कंडिशनरवर १0 ते ४0 टक्के सूट दिली जात असून, तयार कपड्यांवर तब्बल ५0 टक्क्यांपर्यंत सवलत सुरू आहे. या आठवड्यात आॅनलाइन मार्केटमधील पेटीएम मॉलने तीन दिवसांचा ‘प्री-जीएसटी’ सेल सुरू केला आहे. तो १३ ते १५ जूनपर्यंत सुरू होता. या सेलमध्ये सहा हजार रिलेटर्स सहभागी होते आणि त्यांनी ग्राहकांसाठी ५00 ब्रॅण्ड विकायला ठेवले होते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि तयार कपड्यांसह दुचाकी गाड्यांच्या किमतीवरही मोठी सवलत दिली जाते आहे. बजाज आॅटोने दुचाकीच्या खरेदीवर साडेचार हजार रुपयांची सूट दिल्याचे सांगण्यात येत आहे. "प्री-जीएसटी सेलमध्ये टीव्ही, ग्राहकांच्या उपयोगाच्या वस्तू, लॅपटॉप, डीएसएलआर कॅमेरा यांच्या खरेदीवर २0 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे, तर ब्लूटूथ स्पीकर, चपला, दागिन्यांवर ५0 टक्के सवलत २५ टक्के कॅशबॅक आहे. जीएसटी लागू होण्याआधी दुकानामधील माल संपवावा, या विचाराने किरकोळ विक्रेत्यांनी या सेलसाठी पुढाकार घेतला आहे.- फ्लिपकार्ट, अमेझॉन या आॅनलाइन शॉपिंग बेवसाइट्सवर बाजारातील तयार कपडे विकले जातात. त्यांना जीएसटी लागू झाला तरी जास्त परिणामांना सामोरे जावे लागणार नाही. तरीही त्यांनी सध्या असलेला स्टॉक संपविण्यासाठी या भरघोस सवलत द्यायला सुरुवात केली आहे.