Join us

खरेदीचा यंदा धडाका! महागाई, जागतिक मंदीच्या सावटातही बाजारात चैतन्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 9:55 AM

गगनाला भिडलेली महागाई आणि जागतिक पातळीवर मंदीचे सावट असतानाही यंदा भारतात सणासुदीच्या हंगामात खरेदीचा जोरदार धूमधडाका सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : गगनाला भिडलेली महागाई आणि जागतिक पातळीवर मंदीचे सावट असतानाही यंदा भारतात सणासुदीच्या हंगामात खरेदीचा जोरदार धूमधडाका सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या सणासुदीच्या हंगामात आतापर्यंत लोकांनी कार, घरे, टीव्ही यांसारख्या सर्वच वस्तूंची जोरदार खरेदी चालविली आहे. प्रवासही जोरात असून, दागिने खरेदीवरही लोकांच्या उड्या पडल्या आहेत.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात यंदाचा सणासुदीचा हंगाम सुरू झाला. तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल. या हंगामात २७ अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा व्यवसाय होईल, असा अंदाज आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा २५ टक्क्यांनी अधिक आहे. यंदा वेतन आणि रोजगारात वाढ झाल्याचा फायदाही बाजारास मिळत आहे.

वाहन विक्री सुसाट

यंदाच्या नवरात्रीत दुचाकींसह सर्व वाहनांची एकत्रित विक्री ५७ टक्क्यांनी वाढली आहे. कोविडपूर्व काळाच्या तुलनेत ती एक पंचमांशांनी अधिक आहे.

घर खरेदी ७०%नी वाढली

देशातील ७ मोठ्या शहरांतील घर खरेदी सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत ७० टक्क्यांनी वाढली आहे. बिल्डरांनी सणासुदीत मोठी सूट देऊ केल्याचे दिसून येत आहे.

२०१८ पासून ऑनलाइन खरेदीदारांची संख्या ४ पटीने वाढून २०० दशलक्ष झाली आहे. मोबाइल हँडसेट व फॅशनेबल कपड्यांची मागणी छोट्या शहरांपर्यंत पोहोचली आहे. येणाऱ्या ३ महिन्यांत ही मागणी मजबूत राहील. - संजय कोठारी, रेडसीअरचे सहयोगी भागीदार

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :बाजार