नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पाच महिने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान सहन केले आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक बाजारभाव मिळू लागताच, शासनाने निर्यातबंदी केल्यामुळे पुन्हा भाव कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी मुंबई बाजार समिती संचालकांनीही केली आहे.
देशातील सर्वाधिक कांद्याची विक्री मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असते. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन ७०० ते ८०० टन कांद्याची विक्री मार्केटमध्ये होत आहे. राज्यातून व देश, विदेशातूनही कांदा येथे विक्रीसाठी येत असतो. मार्चपर्यंत कांद्याला समाधानकारक भाव मिळत होता, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर कांद्याचे दर घसरले.
मार्चमध्ये होलसेल मार्केटमध्ये १५ ते १९ रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा आॅगस्टमध्ये ५ ते १० रुपयांवर आला.
सप्टेंबरमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळू लागला. बाजार समितीमध्ये दर १५ ते २७ रुपये दर मिळू लागल्यामुळे पुणे, नाशिक परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात माल मुंबईत पाठवू लागले होते, परंतु निर्यातबंदी केल्यामुळे बाजारभाव पुन्हा कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, संचालक अशोक वाळुंज यांनीही शेतकºयांच्या हितासाठी निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही याविषयी वस्तुस्थिती मांडली आहे.
किरकोळमध्ये ३५ रुपये किलो
मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये मंगळवारी कांदा १५ ते २७ रुपये किलो दराने विकला जात होता. किरकोळ मार्केटमध्ये हे दर ३० ते ३५ रुपयांवर गेले आहेत.
मुंबई बाजार समितीमधील प्रतिकिलोचे बाजारभाव
महिना बाजारभाव
मार्च १५ ते १९
एप्रिल ११ ते १६
मे ९ ते १२
जून ५ ते ११
जुलै ५ ते १०
आॅगस्ट ६ ते १०
सप्टेंबर १५ ते २७
मार्च ते आॅगस्टदरम्यान कांद्याला बाजारभाव कमी होते. कोरोनामुळे या काळात शेतकºयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. सद्यस्थितीमध्ये समाधानकारक बाजारभाव मिळू लागले होते, परंतु अचानक निर्यातबंदी केल्यामुळे त्याचा फटका शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे. शासनाने शेतकºयांच्या हितासाठी बंदी उठवावी, अशी मागणी आम्ही केली आहे. - अशोक वाळुंज, संचालक, मुंबई बाजार समिती
कोरोनातून सावरलेल्या शेतकऱ्यांना निर्यातबंदीचा फटका; पुन्हा भाव कोसळण्याची भीती
सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन ७०० ते ८०० टन कांद्याची विक्री मार्केटमध्ये होत आहे. राज्यातून व देश, विदेशातूनही कांदा येथे विक्रीसाठी येत असतो.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:48 AM2020-09-16T01:48:48+5:302020-09-16T01:49:06+5:30