Join us

मार्चमध्ये निर्यातीत सुमारे ३५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:59 AM

गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक घट

नवी दिल्ली : मार्च महिन्यामध्ये भारताच्या निर्यातीमध्ये ३४.५७ टक्क्यांनी घट झाली असून, गेल्या १० वर्षांमधील ही सर्वाधिक घट आहे. विशेष म्हणजे या काळात आयातीमध्येही घट झालेली बघावयास मिळाली आहे. यामुळे आयात-निर्यात व्यापारातील तूट ९.७६ अब्ज डॉलरवर आली असून, हा १३ महिन्यातील नीचांक आहे.मार्च महिन्यामध्ये झालेल्या देशाच्या आयात-निर्यात व्यापाराची अधिकृत आकडेवारी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मार्च महिन्यात निर्यात २१.४१ अब्ज डॉलर झाल्याचे स्पष्ट केले आहे. मागील वर्षाच्या मार्च महिन्याशी तुलना करता निर्यातीमध्ये ३४.५७ टक्के घट झाली आहे. त्यामुळे सन २०१९-२० या आर्थिक वर्षामधील निर्यात ३१४.३१ अब्ज डॉलर झाली आहे. मार्च महिन्यात ३१.१६ अब्ज डॉलरची आयात झाली असून घसरणीचे हे प्रमाण २८.१५ टक्के आहे.आयात-निर्यातीमधील तफावत झाली कमीसन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये देशाची आयात ४६७.१९ अब्ज डॉलर झाली आहे. आधीच्या वर्षापेक्षा त्यामध्ये ९.१२ टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊनमुळे पेट्रोलियम पदार्थ आणि सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे आयात-निर्यात व्यापारातील तूट आता १५२.८८ अब्ज डॉलर अशी कमी झाली आहे.