चंदीगड : देशाच्या विविध भागात बटाट्याचे भाव वाढत असतानाच पाकिस्तानला अट्टारी-वाघा मार्गाने दररोज कमीत कमी १५,०० ते २,००० टन बटाट्याची निर्यात होते. पाकिस्तानात सध्या बटाट्याची तीव्र टंचाई आहे.
अट्टारी सीमेनजीकच्या अमृतसर भाजीपाला बाजारातून निर्यातदार दररोज बटाट्यांनी भरलेले ७०-८० ट्रक पाकिस्तानला पाठवत आहेत. यात १,५०० ते २,००० टन एवढा बटाटा असतो. पाकिस्तानात बटाट्याची मोठी मागणी आहे, असे अमृतसर येथील भाजी निर्यातदार अनिल मेहरा यांनी सांगितले.
पाकिस्तानात यंदा बटाट्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने भारताला बटाट्याची शुल्कमुक्त आयात करण्याची परवानगी दिली आहे. पावसाळ््यास मोठ्या प्रमाणात रोग पडल्याने पाकिस्तानात बटाटा पीकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे ही टंचाई उद्भवली. पाकिस्तान सरकारने यंदा जुलैपर्यंत भारतातून बटाट्याची शुल्कमुक्य आयात करण्यास परवानगी दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानातून वर्षभराहून अधिक कालावधीनंतर भारतीय बटाट्याच्या आयातीची मागणी आली आहे.
पंजाब आणि हरियाणाच्या विविध बाजारांतून निर्यातदारांद्वारे बटाट्याची मागणी पुर्ण केली जात आहे. पंजाब आणि चंदीगडच्या किरकोळ बाजारात बटाट्याचा भाव सध्या २५ ते ३० रुपये प्रतिकिलो एवढा आहे.
वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्थानिक बाजारात याची उपलब्धता वाढवण्याकरता केंद्र सरकारने बटाट्यासाठी ४५० डॉलर प्रतिटन एवढे किमान निर्यात मुल्य निश्चित केले आहे. यानंतरही पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर बटाट्याची निर्यात होत आहे. दरम्यान, बटाटा साठ्याची मर्यादा निश्चितीच्या केंद्राच्या निर्णयाबद्दल पंजाबमध्ये उत्पादकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. (वृत्तसंस्था)