नवी दिल्ली: मोदी सरकारनं 2018-19 मधील निर्यातीची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार वर्षभरात निर्यातीमध्ये 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात भारतानं 331 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली. यामुळे 2013-14 मधील निर्यातीचा विक्रम मोडीत निघाला. 2013-14 मध्ये भारतानं निर्यात केलेल्या वस्तू आणि सामानाचं मूल्य 314.4 अब्ज डॉलर होतं.
महिन्यांची तुलना केल्यास मार्चमध्ये निर्यातीत 11 टक्क्यांची वाढ झाली. याआधी ऑक्टोबर 2018 मध्ये निर्यात 17.86 टक्क्यांनी वाढली होती. औषध, रसायन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्यातीत मोठी वाढ झाल्यानं देशाची एकूण निर्यात वाढली. 'जगात मंदीसदृश्य वातावरण असताना 2018-19 मध्ये भारताची निर्यात 331 अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचली. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. जागतिक बाजारपेठेत आव्हानात्मक स्थिती असताना भारताची निर्यात वाढली आहे,' असं वाणिज्य मंत्रालयानं परिपत्रकात म्हटलं आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात व्यापारातील तूट कमी होऊ 10.89 अब्ज डॉलरवर आली. मार्च 2018 मध्ये व्यापारातील तूट 13.51 अब्ज डॉलर होती. मार्चमध्ये सोन्याची आयातीत 31.22 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या काळात 3.27 अब्ज डॉलरचं सोनं आयात करण्यात आलं. तर खनिज तेलाची आयात 5.55 टक्क्यांनी वाढली. गेल्या आर्थिक वर्षात आयातीत 8.99 टक्क्यांची वाढ झाली. या आर्थिक वर्षात देशात 507.44 अब्ज डॉलरचं सामान आयात करण्यात आलं.
निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारला मोठा दिलासा, पाच वर्षांत पहिल्यांदाच निर्यातीत वाढ
पाच वर्षांपूर्वीचा निर्यातीचा विक्रम मोडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:45 PM2019-04-16T13:45:06+5:302019-04-16T13:46:20+5:30