मुंबई : गेल्या वर्षभरात प्रवासी व व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीत घसरण झाली असून, दुचाकी, तीनचाकींच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ च्या अहवालात ही माहिती आहे. औद्योगिक विकास प्रामुख्याने निर्यातीवर अवलंबून असतो. भारतात आॅटोमोबाइल क्षेत्रात जवळपास २.९० कोटी रोजगार आहे. या क्षेत्रातील प्रवासी वाहनांच्या निर्यातीत आधीच्या वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात १.८० टक्के घट झाली आहे. व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीतही १३.२८ टक्क्यांची घट झाली आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना मात्र या काळात परदेशांत चांगली मागणी होती. या वाहनांची निर्यात अनुक्रमे २०.३० आणि ३७.०२ टक्क्यांनी वाढली. व्यावसायिक वाहनांच्या देशातील विक्रीत मात्र १९.३० टक्के वाढ झाली. प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीतही ८.०४ टक्के वाढ झाली आहे.
>विदेशी ‘ई-बसेस’चा फटका
एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान भारतात २.६४ कोटी वाहने तयार झाली. मागील वर्षी याच काळात हा आकडा २.३० कोटी होता. विदेशात बस श्रेणीत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळेच भारतीय प्रवासी व व्यावसायिक वाहनांची निर्यात घटत असल्याचे ‘सीआम’चे म्हणणे आहे. दुचाकींची देशांतर्गत विक्री १४.४७ व तीन चाकी वाहनांची देशांतर्गत विक्री १९.११ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र दुचाकीतील मोपेडच्या विक्रीत ४.८३ टक्के घट झाली.
वाहनांच्या विक्रीतील वाढ
(आकडे टक्क्यांत)
प्रवासी कार्स : ३.६२
युटिलिटी वाहने : २१.३४
व्हॅन : ४.२५
अवजड व्यावसायिक : ११.९१
हलकी व्यावसायिक : २४.६४
प्रवासी तीन चाकी : २२.३६
मालवाहू तीन चाकी : ६.८०
स्कूटर्स : २१.१८
मोटरबाइक : १२.६६
मोपेड : उणे ४.८३
(एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८)
प्रवासी, व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीत घट, देशातील विक्रीमध्ये सर्वच वाहने सुसाट
गेल्या वर्षभरात प्रवासी व व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीत घसरण झाली असून, दुचाकी, तीनचाकींच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ च्या अहवालात ही माहिती आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:02 AM2018-03-17T01:02:36+5:302018-03-17T01:02:36+5:30