- संदीप बावचेजयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : देश-परदेशातील प्रेमवीरांना भुरळ घालणाऱ्या गुलाब फुलांवर यंदा मर्यादा आली आहे. परदेशातील लॉकडाऊन, निर्यातीसाठी झालेली तिप्पट भाडेवाढ, दराची तफावत, शिवाय गुलाब फुलांचे उत्पादन घटल्यामुळे पन्नास टक्केच गुलाब फुलांची निर्यात होणार आहे. त्यामुळे फूल उत्पादकांनी यंदा स्थानिक बाजारपेठेवरच भर दिला आहे.युरोपियन राष्ट्रांसह भारतामध्येही व्हॅलेंटाइन डे युवक व युवती मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी लाल गुलाब फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. पॉलिहाऊसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. गुलाब फुले निर्यात करण्यासाठी जानेवारीपासून तयारी केली जाते. गतवर्षी मार्चनंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे गुलाब फूल उत्पादक मोठ्या अडचणीत आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय, परदेशात १५ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर गुलाब फुले पाठविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच निर्यातीसाठी विमानाची तिप्पट भाडेवाढ झाली आहे. काढणी व पाठवणी यांचा खर्च परवडत नाही. शिवाय, दराची तफावत, यामुळे लाल गुलाब फुलांची निर्यात मोठ्या प्रमाणात घटणार आहे. दोन लाख गुलाबांची निर्यात होण्याची शक्यता...गेल्या वर्षी शिरोळ तालुक्यातून दहा लाख गुलाबांची निर्यात झाली होती. या गुलाबांना सरासरी ९ ते १८ रुपये दर मिळाला होता. या वर्षी केवळ दोन लाख गुलाबांची निर्यात होण्याची शक्यता आहे. या गुलाबांना सरासरी ८ ते १३ रुपये दर मिळू शकतो.इंग्लंडमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन आहे. निर्यातीसाठी विमान भाड्यातही वाढ झाल्यामुळे खर्च परवडत नाही. त्यामुळे यंदा ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने स्थानिक बाजारपेठेवर भर दिला असला तरी परदेशात ५० टक्केच फुले निर्यात होणार आहेत.- रमेश पाटील, श्रीवर्धन बायोटेक, कोंडिग्रे, जि. कोल्हापूर
‘व्हॅलेंटाइन डे’ला गुलाबाची निर्यात आली निम्म्यावर, परदेशातील लॉकडाऊनचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 5:57 AM