Join us

कोरोनातही मसाल्यांच्या निर्यातीला बहर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 2:15 AM

१९ टक्के वाढ : वेलदोडे, आल्याला मागणी; अर्थचक्राला प्रगतीची फोडणी

अविनाश कोळी 

सांगली : कोरोना काळात आरोग्यदायी काढ्यांसाठी मसाल्यांचा देशांतर्गत वापर वाढला असतानाच, विदेशातील मागणीतही आता मोठी वाढ नोंदविली गेली आहे. भारतीय मसाला बोर्डाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत  मसाल्याच्या पदार्थ निर्यातीत मागील वर्षाच्या सहामाहीपेक्षा सुमारे १९ टक्के वाढ झाली आहे. देशातील मसाला उत्पादनातही जवळपास दीड टक्का वाढ होण्याची चिन्हे आहेत. अन्य क्षेत्रांचे अर्थचक्र बिघडले असताना, मसाल्यांनी अर्थचक्राला प्रगतीची फोडणी दिली आहे.

भारत प्रामुख्याने मिरची, जिरे, मसाला तेल, कडीपत्ता, मिरपूड, कोथिंबीर, बडीशेप, लसूण, पुदिना, मेथी दाणे, ओवा आणि जायफळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर करतो. भारताची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, चीन, व्हिएतनाम, थायलंड, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांना होत असते. कोरोना काळात मसाल्यांना देशांतर्गत मागणी खूप वाढली होती. आरोग्यदायी काढा करण्यासाठी  मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. विदेशातही आता मसाल्याच्या पदार्थांची मागणी वाढत आहे. मसाला बोर्डाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते सप्टेंबर, २०२० या काळात ७ लाख टन मसाल्यांची निर्यात झाली. मागील वर्षात याच काळात ती ५ लाख ८६ हजार टन इतकी होती. निर्यातीत एकूण वाढ १९ टक्के, तर उत्पन्नात १६ टक्के नोंदली गेली आहे. दरवर्षी १० ते १२ लाख टन मसाल्याच्या विविध पदार्थांची निर्यात केली जाते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ११ लाख २५० टन मसाले निर्यात झाले. निर्यात होत असलेले लहान वेलदोडे व मिरचीच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे, अन्य मसाल्यांचे दर मात्र स्थिर आहेत.

मागणीत वाढ (एपिल ते सप्टेंबर २०२०) मसाला पदार्थ    २०१९    २०२०    वाढ टक्केलहान वेलदोडे    ४०५ टन    १,९०० टन    ३६९ आले    १२,७१० टन    २३,७०० टन    ८६ मेथी दाणे    १०,८६०    १७,२००    ५८ जिरे    १,१५,०००    १,५३,०००    ३३ हळद    ६९,५००    ९९,०००    ४२ इतर मसाले    १५,५००    १७,७५०    १५  

कोरोनामुळे हळदीसह अन्य मसाला पदार्थांना देशांतर्गत मागणी वाढत आहे. आरोग्यदायी मसाल्यांचे महत्त्व लक्षात येत असल्याने हा फरक दिसत आहे. त्यामुळे परदेशातील मागणीही वाढत आहे.- सुरेंद्र जैन, मसाले उद्योजक, इंदूर

टॅग्स :व्यवसाय