कोची - चालू वित्तवर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत भारताने ५.५७ लाख टन मसाले आणि मसाल्यांच्या पदार्थांची निर्यात केली. त्यांची किंमत ८,८५०.५३ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात ८,७०० कोटी रुपये किमतीचे ४.५ लाख टन मसाले निर्यात झाले होते.
यंदाच्या पहिल्या सहामाहीतील मसाल्यांची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वजनाच्या बाबतीत २४ टक्क्यांनी, तर किमतीच्या बाबतीत २ टक्क्यांनी अधिक आहे. डॉलरच्या हिशेबाने यंदा ६ टक्के अधिक उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी या काळात मसाला निर्यातीपोटी १,२९९.९६ दशलक्ष डॉलर मिळाले होते. यंदा ती रक्कम १,३७३.९७ दशलक्ष डॉलर झाली.
भारतीय मसाला बोर्डाचे चेअरमन ए. जयतिलक यांनी जारी केलेल्या निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, मिरची जिरे, हळद, वेलदोडा, लसूण पुदिना या भारतीय मसाल्यांना विदेशात चांगली मागणी आहे. यंदा निर्यातीत अनेक अडथळे असतानाही मसाला बोर्डाने निर्यातीसाठी विशेष प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून मसाला निर्यात वाढली.
जयतिलक यांनी म्हटले की, जागतिक पातळीवर खाद्य वस्तूंच्या सुरक्षेबाबत अत्यंत कठोर सुरक्षा नियम करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार अस्थिर आहे. असे असतानाही भारतीय मसाल्यांची निर्यात सातत्याने वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. (वृत्तसंस्था)
मिरची सर्वोच्च स्थानी!
निर्यात होणा-या मसाल्यांत यंदाही मिरची सर्वोच्च स्थानी होती. यंदा २.३५ लाख टन मिरच्यांची यंदा निर्यात झाली. त्यांची किंमत २,१२५.९० कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात १.६५ लाख टन मिरच्या निर्यात झाल्या होत्या. यंदा मिरच्यांच्या निर्यातीत ४२ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल निर्यात जि-याची झाली. एकूण १,३२४.५८ कोटी रुपयांचे ७९,४६० टन जिरे या काळात निर्यात झाले आणि ५४७.६३ कोटी रुपये किमतीच्या ५९ हजार टन निर्यातीसह हळद तिस-या स्थानी राहिली.
2.35 लाख टन मिरच्यांची यंदा निर्यात झाली. त्यांची किंमत 2,125.90 कोटी रुपये आहे.
मसाल्यांच्या निर्यातीत २४ टक्के वाढ, उत्पन्नही वाढले
चालू वित्तवर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत भारताने ५.५७ लाख टन मसाले आणि मसाल्यांच्या पदार्थांची निर्यात केली. त्यांची किंमत ८,८५०.५३ कोटी रुपये आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:53 AM2018-01-05T00:53:30+5:302018-01-05T00:53:37+5:30