Join us

FASTag KYC अपडेट करण्यासाठी मुदतवाढ, पाहा आता कधीपर्यंत करता येणार Update? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 12:08 PM

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.

FASTag KYC : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI ) फास्टॅग केवायसी अपडेट (Fastag KYC) करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी यासाठी २९ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, ती आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ युजर्सना आणखी एका महिन्याचा वेळ मिळाला आहे. एनएचएआय वन व्हेईकल, वन फास्टॅग उपक्रमांतर्गत आता एका वाहनासाठी एक फास्टॅग असेल. हा फास्टॅग इतर कोणत्याही वाहनासाठी वापरता येणार नाही. पेटीएम फास्टॅग युझर्सच्या संभाव्य समस्या लक्षात घेऊन एनएचएआयनं मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

एनएचएआयनं राष्ट्रीय महामार्गांवरील टोल पेमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी वेळेवर केवायसी वेळेवर अपडेट करण्यास सांगितलं आहे. तुम्ही ३१ मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट न केल्यास तुमचे फास्टॅग खातं निष्क्रिय होऊ शकतं. 

या कागदपत्रांची गरज 

केवायसी डिटेल्स अपडेट करण्यासाठी, वाहन मालकाला काही कागदपत्रं सादर करावी लागतील, ज्यात वाहन नोंदणी प्रमाणपत्र, चालकाचा परवाना आणि पॅन किंवा मतदार ओळखपत्र यांचा समावेश आहे. याशिवाय पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे. 

कसं कराल अपडेट? 

तुम्ही ज्या कंपनीचा फास्टॅग घेतला आहे त्या कंपनीचं फास्टॅग वॉलेट ॲप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर फास्टॅगसह दिलेल्या मोबाइल नंबरसह लॉगिन करा आणि नंतर माय प्रोफाइलवर जा, तिथे केवायसी वर क्लिक करा. जर ते अपडेट केलं नसेल तर केवायसी फिल ऑप्शनवर क्लिक करा आणि मागितलेली माहिती एन्टर करा. 

जर तुम्हाला ही माहिती ऑनालाइन अपडेट करायची असेल तर www.fastag.ihmcl.com वर जा. इथे तुमच्या रजिस्टर मोबाईलच्या मदतीनं लॉग इन करा. यानंतर डॅशबोर्ड मेन्यूमध्ये My Profile ऑप्शनवर जा. इकडे तुमचं केवायसी स्टेटस चेक करा. जर तुमचं केवायसी अपडेट केलंल नसेल तर सब सेक्शनमध्ये जा. इथे आवश्यक माहिती, जसं आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ आणि फोटो अपलोड करा. यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.

टॅग्स :फास्टॅगभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणपे-टीएम