नवी दिल्ली - विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड अद्याप लिंक केले नसेल तर ही तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता तुम्ही 30 जूनपर्यंत आधार कार्ड कल्याणकारी योजनांशी लिंक करू शकता. याआधी ही मुदत 31 मार्चपर्यंत होती. तसेच सीबीडीटीने आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याची मुदतही 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारांच्या ज्या योजनांचे लाभ व अनुदान यासाठी ‘आधार’ क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्या लाभार्थींसाठी ‘आधार’ जोडणीसाठी ३१ मार्च हीच अंतिम मुदत कायम राहील, असे न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. न्यायालयाने १५ डिसेंबरला दिलेल्या अंतरिम आदेशाने बँक खाती ‘आधार’शी जोडून घेण्यास व मोबाइल फोन ग्राहकांनी ‘आधार’शी निगडित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास ३१ माचपर्यंत मुदत वाढवून दिली होती. न्यायालयाने 13 मार्च रोजी ही मुदत हटविली आणि आधीचा अंतरिम आदेश अंतिम निकाल होईपर्यंत लागू केला. म्हणजेच ‘आधार’ सक्तीच्या वैधतेवर निकाल होईपर्यंत, या दोन गोष्टींसाठी सक्ती लागू असणार नाही. ‘आधार’ सक्तीच्या घटनात्मक वैधतेवर निकाल होईपर्यंत बँक खाती आणि मोबाइल फोन ‘आधार’शी जोडून घेण्याची सक्ती लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने, कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक करण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 9:37 PM