नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाला विमाने पुरविण्याची मोठी आॅर्डर दिल्यास एफ-१६ जातीची लढाऊ विमाने भारतात बनवून निर्यात करण्याचा प्रस्ताव अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टिनने दिला आहे.भारतीय लष्कराला एक इंजिन असलेले किमान १00 विमाने खरेदी करायची आहेत. ही विमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत भारतातच बनविण्यात येणार आहेत. लॉकहीड आणि स्वीडनची साब या दोन कंपन्या त्यासाठी इच्छुक आहेत. लॉकहीडच्या एफ-१६ व्यवसाय विभागाचे प्रमुख रँडॉल एल. हॉवर्ड यांनी सांगितले की, कंपनी भारताला एफ-१६ विमान उत्पादनाचे केंद्र बनवायला तयार आहे. केवळ भारतासाठीच नव्हे, तर अन्य देशांसाठीही भारतातील प्रकल्पात विमाने बनविण्यास कंपनी इच्छुक आहे. वास्तविक अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील फोर्ट वर्थ येथील एफ-१६ उत्पादन प्रकल्प कंपनी बंद करीत आहे. साऊथ कॅरोलिना येथील ग्रीनव्हिले येथील प्रकल्पातून नव्या विमानांचा पुरवठा करण्यात येणार आहे.तथापि, भारतात प्रकल्प उभा राहणार असेल, तर यापुढचा सर्व पुरवठा येथून केला जाऊ शकेल.हॉवर्ड म्हणाले की, आमचा पुढचा ग्राहक लवकरच आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा आहे. या ग्राहकासाठी आम्ही ग्रीनव्हिले प्रकल्पाबाहेर विमानांचे उत्पादन करू इच्छितो. हे उत्पादन आपल्या भूमीत आणण्याची भारताला संधी आहे. आमचा हाच प्रस्ताव आहे. एफ-१६ विमानांच्या उत्पादनाचा एकच एक प्रकल्प भारतात उभारण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पातून जगभरातील मागणी पूर्ण केली जाऊ शकेल.एका वरिष्ठ सरकारी अधिकाºयाने सांगितले की, लॉकहीड आणि साब या दोन्ही कंपन्यांना येत्या काही दिवसांत भारत सरकारकडून औपचारिक प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात येईल. या प्रस्तावात जेट विमानांचे भारतात उत्पादन करण्यासाठी आवश्यक डिझाइन प्लॅन, विकास आणि उत्पादन सुविधा याचा आराखडा कंपन्यांना सरकारकडे सादर करावा लागेल.सूत्रांनी सांगितले की, विमानांच्या निर्मितीसाठी विदेशी कंपन्यांना भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी करावी लागणार आहे. लॉकहीडने ‘टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स’सोबत भागीदारी करार केला आहे. साबने अद्याप भागीदारी जाहीर केलेली नाही. साब ही कंपनी ‘ग्रीपेन ई’ नावाची लढाऊ विमाने बनविते.
एफ-१६ विमाने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत भारतातच तयार करण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:23 AM