नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून भारतात सोशल मीडियाचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इतकेच नव्हे तर आता गुगल (Google) आणि फेसबुकला (Facebook) भारतातील डिजिटल मीडियाच्या जाहिरातींमुळे मोठा फायदा होत असल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुक आणि गूगल यांना जाहिरातींतून मिळणारा एकत्रित महसूल पहिल्या दहा क्रमांकांवरील पारंपरिक प्रसार माध्यमांपेक्षा सुमारे १५ हजार कोटी रुपये अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
गुगल आणि फेसबुक यांना जाहिरातीतून वाढलेला महसूल हा भारतातील पारंपरिक डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले जात आहे. भारतातील डिजिटल प्रसार माध्यमांना जाहिरातींतून मिळणाऱ्या एकूण महसुलात ८० टक्के वाटा फेसबुक इंडिया आणि गूगल इंडिया यांचा आहे. ‘दि इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पारंपरिक माध्यम कंपन्यांना खबरदारीचा इशारा
ऑनलाइन जाहिराती हळूहळू अन्य माध्यमांच्या हातून निसटत असल्याचे दिसून येत होते. मात्र फेसबुक आणि गूगल या बड्या तंत्रज्ञान कंपन्यांना भारतातील ऑपरेशन्समधून मिळणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीवरून पारंपरिक माध्यम कंपन्यांना खबरदारीचा इशारा मिळाल्याचे सांगितले जात आहे. भारतातील पहिल्या १० क्रमांकांवरील पारंपरिक माध्यम कंपन्यांना जाहिरातींतून ८ हजार ३९६ कोटी रुपये महसूल मिळत असताना फेसबुक आणि गूगल या दोन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचा एकत्रित जाहिरात महसूल त्यांच्याहून अधिक म्हणजे २३ हजार २१३ कोटी रुपये इतका असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारतातील माध्यमांत किती मिळाला महसूल?
बाजारपेठेत सर्वाधिक भांडवल असलेल्या ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेस’चा गेल्या आर्थिक वर्षांतील महसूल ७ हजार ७२९ कोटी रुपये होता. यापैकी जाहिरातींचा महसूल सुमारे ३ हजार ७१० कोटी रुपये होता. त्या तुलनेत, फेसबुक इंडियाचा जाहिरात महसूल ९ हजार ३२६ कोटी रुपये आणि गुगलचा जाहिरात महसूल १३ हजार ८८७ कोटी रुपये इतका होता. दुसरीकडे, सर्वात मोठ्या प्रक्षेपण कंपन्यांपैकी ‘सन टीव्ही नेटवर्क’चे जाहिरातींतून मिळालेले आणि ‘ब्रॉडकास्ट स्लॉट्स’च्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न ९९८.९ कोटी रुपये होते. जे केवळ फेसबुकच्या जाहिरातींच्या उत्पन्नाच्या एक दशांश इतके होते.