Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिओमध्ये फेसबुक गुंतवणार ४३ हजार कोटी

जिओमध्ये फेसबुक गुंतवणार ४३ हजार कोटी

सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक; खरेदी करणार ९.९ टक्के हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:45 AM2020-04-23T01:45:51+5:302020-04-23T07:10:32+5:30

सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक; खरेदी करणार ९.९ टक्के हिस्सा

Facebook invests 5 7 billion dollar in Jio Platforms | जिओमध्ये फेसबुक गुंतवणार ४३ हजार कोटी

जिओमध्ये फेसबुक गुंतवणार ४३ हजार कोटी

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडमध्ये फेसबुक ४३ हजार ५७४ कोटी रुपये गुंतविणार आहे. याबाबतचा करार या दोन्ही कंपन्यांमध्ये झाला आहे. भारतामध्ये आत्तापर्यंत झालेली ही सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक ठरली आहे. या गुंतवणुकीमुळे फेसबुकला जिओ प्लॅटफॉर्म्समधील ९.९९ टक्के हिस्सा मिळणार आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्स रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात डिजिटल सोसायटी उभी करण्याचा कंपनी प्रयत्न करीत आहे. यासाठी जिओची आघाडीची डिजिटल अ‍ॅप्स इको-सिस्टीम आणि भारतातला प्रथम क्रमांकाचा अतिवेगवान कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्म एकाच छत्राखाली आणण्यात आले आहेत. रिलायन्स जिओ इन्फोकॉम देशातील ३८.८ कोटींहून अधिक ग्राहकांना कनेक्टिव्हिटी पुरवते. ही कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या मालकीची आहे.

ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, स्मार्ट डिव्हाइसेस, क्लाउड आणि एज कॉम्प्युटिंग, बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट आॅफ थिंग्स, आॅगमेंटेन्ड व मिक्स्ड रिअ‍ॅलिटी आणि ब्लॉक चेन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर जिओने जागतिक दजार्चा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

भारतात फेसबुकचे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक वापरकर्ते आहेत. भारतातील स्वयंउद्योजक गुणवत्ता आणि संधी यांचा विचार करून फेसबुकने अनेक वर्षे भारतात गुंतवणूक केली आहे.

फेसबुक आणि जिओमधील ही भागीदारी अनेक अर्थांनी अभूतपूर्व आहे. जगातील कोणत्याही तंत्रज्ञान कंपनीत मायनॉरिटी हिश्श्यासाठी झालेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे आणि भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील ही सर्वांत मोठी थेट परकी गुंतवणूक आहे.

ही गुंतवणूक नियामक व इतर आवश्यक परवानग्यांच्या अधीन आहे. यासाठी वित्तीय सल्लागार म्हणून मॉर्गन स्टॅनले आणि सल्लागार म्हणून एझेडबी अँड पार्टनर्स आणि डेविस पोल्क अँड वॉर्डवेल यांनी काम पाहिले. या भागीदारीमुळे भारतीय नागरिक आणि भारतीय अर्थव्यवस्था यांचा सर्वांगीण विकास होण्यास गती मिळेल.

देशातील सहा कोटी सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायिक 12 कोटी शेतकरी, 3 कोटी छोटे व्यापारी आणि असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी लघु व मध्यम उद्योगांना डिजिटल सेवा पुरविण्यावर भर असणार आहे.

कोरोनाच्या वैश्विक साथीच्या काळात झालेल्या उलथापालथीमुळे ही भागीदारी भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सर्वंकष डिजिटलायझेशन गरजेचे आहे. पुढील काळात निर्माण रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधीपासून कोणीही वंचित राहू नये, अशी आमची धारणा आहे.

याचबरोबर जिओ प्लॅटफॉर्म्स, रिलायन्स रिटेल लिमिटेड (रिलायन्स रिटेल) यांच्यात व्यवसायिक भागीदारी झाली आहे. यामुळे आता रिलायन्स रिटेलच्या व्यवसाय वृद्धीसाठी जिओ मार्ट प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करेल आणि छोट्या व्यावसायिकांना मदत करेल. देशातील नागरिक आणि व्यवसायिकांना जोडण्याची महत्त्वाची भूमिका व्हॉट्सअ‍ॅप सध्या पार पाडत आहे. रिलायन्स रिटेलचा नवीन व्यवसाय प्लॅटफॉर्म जिओ मार्ट हा कोट्यवधी छोटे व्यापारी आणि किराणा दुकाने यांना चांगली सेवा देण्यासाठी सक्षम करणारा आहे. ग्राहकांना नजीकच्या किराणा दुकानात उत्पादने आणि सेवा जिओ मोबाईलचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मिळवता येतील.
कोट

आम्ही २०१६ मध्ये जिओची सुरुवात केली, त्यावेळी भारताच्या डिजिटल सर्वोदयाचे स्वप्न आमच्या समोर होते. प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी डिजिटल सेवा देऊन भारताला जगातील आघाडीची डिजिटल सोसायटी बनविण्याचा आमचा मानस होता. यासाठी दीर्घकालीन भागीदार म्हणून फेसबुकचे आम्ही स्वागत करतो.
- मुकेश अंबानी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स

Web Title: Facebook invests 5 7 billion dollar in Jio Platforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.