Join us

ऐकावं ते नवलंच! अंबानींच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी संपत्ती झुकरबर्गनं वर्षभरातच कमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 2:13 PM

मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी संपत्ती एका वर्षात निर्माण केली आहे. पाहा कशी झाली त्यांच्या संपत्तीत इतकी वाढ.

रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी संपत्ती एका वर्षात निर्माण केली आहे. फोर्ब्सनुलार मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती गेल्या १२ महिन्यांत ११२.६ अब्ज डॉलर्सनं वाढली आहे. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ११६ अब्ज डॉलर्स आहे. 

मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत ही वाढ मेटा शेअर्सच्या वाढीमुळे झाली आहे. मेटाच्या शेअर्सचे मूल्य एका वर्षात जवळपास तिप्पट झालंय. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात आणि AI तसंच metaverse मुळे कंपनीचे शेअर्स वाढले. मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती आता ११७ अब्ज डॉलर्स एवढी आहे. फोर्ब्सच्या नुसार ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या लिस्टनुसार ते आता चौथ्या स्थानी असून गेल्या वर्षी ते १६ व्या स्थानावर होते. 

एक असा काळ होता जेव्हा मेटाचा स्टॉक त्यांच्या २०२१ च्या उच्चांकी स्तरावरून ७५ टक्क्यांनी घसरला, त्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या जवळपास एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांना नारळ दिला. मार्क झुकेरबर्ग यांनी कॅलिफोर्नियातील त्यांचा महाल २९.६ अब्ज डॉलर्सला विकला असल्याचंही समोर आलं होतं. 

पहिल्या क्रमांकावर कोण?

फोर्ब्सच्या या यादीनुसार बर्नार्ड अर्नॉल्ट आणि त्यांचं कुटुंब २३३ अब्ज डॉलर्स संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे. बर्नार्ड अर्नॉल्ट हे LVMH चे प्रमुख आहेत आणि त्यानंतर जेफ बेझोस यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती १९८.७ अब्ज डॉलर्स आहे. तिसऱ्या क्रमांकावर टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क आहेत. त्यांची एकूण संपत्ती १९०.२ अब्ज डॉलर्स आहे.

टॅग्स :मार्क झुकेरबर्गरिलायन्समुकेश अंबानी