नवी दिल्ली : जगभरातील आर्थिक मंदीच्या बातम्या येत आहेत. यातच आता फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंक (Meta Platforms Inc.) आपल्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करण्याची तयारी करत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने (Wall Street Journal) आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. जर्नलने या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
बुधवारपर्यंत नोकऱ्यांमध्ये कपात होऊ शकते, असे जर्नलने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने आधीच कर्मचाऱ्यांना या आठवड्यापासून अनावश्यक प्रवास रद्द (Non-essential travel) करण्यास सांगितले आहे. तसेच, वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, मेटा कंपनीच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग यांनी सप्टेंबरमध्ये कर्मचारी कपातीची योजना तयार केली. या योजनेत फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही मुख्य प्लॅटफॉर्मच्या मंदावलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हेडकाउंट कमी करण्याचा समावेश आहे. तेव्हा मार्क झुकरबर्ग म्हणाले होते, 2023 मध्ये मेटा या वर्षापेक्षा लहान असण्याची शक्यता आहे.
का होणार कर्मचाऱ्यांची कपात?
जगभरात मेटा कंपनीचे प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा समावेश आहे. परंतु इंटरनेटला एका नवीन स्तरावर नेण्याच्या प्रयत्नात कंपनीला मेटाव्हर्स व्यवसायावर बरीच गुंतवणूक करावी लागली आहे. आतापर्यंत गुंतवणुकीनुसार परतावा मिळण्यास सुरुवात झालेली नाही. अशा परिस्थितीत कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी धडपडत आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या शेअर बाजारातील तीव्र मंदीमुळे मेटा कंपनीचे शेअर्सही खूप घसरले आहेत. या वर्षी कंपनीचे शेअर्स जवळपास 73 टक्क्यांनी घसरले आहेत. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीतही अशीच घसरण नोंदवण्यात आली आहे.
सिलिकॉन व्हॅलीमधील नोकऱ्यांचे संकट आणखी गडद!
हेडकाउंट कपातीमुळे सिलिकॉन व्हॅलीमधील नोकऱ्यांचे संकट आणखी गडद होणार आहे. इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात ट्विटरमधील जवळपास 3,700 कर्मचाऱ्यांची कपात केली. इतर कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे किंवा कमी करण्याची योजना आखली आहे, त्यामध्ये राइडहेलिंग फर्म Lyft Inc आणि हार्ड ड्राइव्ह उत्पादक सीगेट टेक्नॉलॉजी होल्डिंग्स पीएलसीचा (Seagate Technology Holdings Plc.) समावेश आहे.