Join us  

Facebook : आणखी नोकऱ्या जाणार! फेसबुकमधील १० हजार कर्मचाऱ्यांवर आले संकट; मेमोही पाठविला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 6:32 AM

Facebook : फेसबुकची पालक कंपनी मेटा आणखी दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याचे समोर आले आहे. याच आठवड्यात कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : फेसबुकची पालक कंपनी मेटा आणखी दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याचे समोर आले आहे. याच आठवड्यात कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मार्चमध्येच यासंबंधीचे संकेत दिले होते. आगामी महिन्यात आणखी दहा हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची आमची योजना आहे, असे त्यांनी सांगितले होते. कंपनीने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ११ हजार लोकांना कामावरून काढले होते.

झळ कुणाला?मेटा परिवारातील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, रिॲलिटी लॅब्ज आणि क्वेस्ट हार्डवेअर अशा सर्वच कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीची झळ बसणार आहे. यासंबंधीचा एक मेमो कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना पाठविला आहे.

हा एक कठीण काळमेटामधील एक वरिष्ठ अधिकारी लोरी गोलर यांनी सांगितले की, मेटासाठी योगदान देणाऱ्या काही मित्र व सहकाऱ्यांना आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे. हा एक कठीण काळ आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी २०२३ हे ‘कार्यक्षमता वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्मचारी कपात केली जात आहे.

डिस्ने करणार मोठी कर्मचारी कपातn अमेरिकेचा बहुराष्ट्रीय माध्यम समूह ‘वॉल्ट डिस्ने कंपनी’नेही आणखी काही हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यात कंपनीच्या मनोरंजन विभागातील १५ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. २४ एप्रिलपर्यंत हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. n डिस्नेच्या टीव्ही, फिल्म, थिम पार्क, काॅर्पोरेट पोझिशन्स अशा सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कंपनीने यंदा फेब्रुवारीमध्येच सात हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. n कंपनीने आपल्या एकूण खर्चात ५.५ अब्ज डॉलरची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ही नोकर कपात करण्यात येत आहे.

भारतात का वाढतेय बेरोजगारी?शिक्षण उद्योग ११७ अब्ज डॉलरचा असून, तो सातत्याने वाढत आहे. नवीन महाविद्यालये सुरू होत आहेत. तरीही तरुण पुरेशा कौशल्य अभावामुळे बेरोजगारीच्या खाईत ढकलला जात आहे. विनाकौशल्याच्या पदव्यांमुळे अर्थव्यवस्था कमजोर होत आहे. नोकरी मिळविण्याच्या स्पर्धेत अनेक तरुण २-२, ३-३ पदव्या घेतात. त्यासाठी पैसा खर्च करतात. छोटे अपार्टमेंट अथवा बाजारांतील दुकानांतही महाविद्यालये चालविली जातात. महामार्गांवर शैक्षणिक संस्थांचे फलक लागलेले दिसतात. ‘जॉब प्लेसमेंट’चे वायदे त्यात केलेले असतात. प्रत्यक्षात मात्र पदवीधरांच्या हाती निराशाच येते.

व्यावहारिक ज्ञान मिळेनाभारतीय शैक्षणिक क्षेत्रात विरोधाभास दिसून येतो. भारतातील प्रमुख आयटी आणि व्यवस्थापन संस्थांनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई व मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला यांच्यासारखे जागतिक व्यावसायिक नेतृत्व निर्माण केले. दुसरीकडे मात्र अशी हजारो छोटी महाविद्यालये आहेत, जे अप्रशिक्षित शिक्षक नेमतात, जुने अभ्यासक्रम शिकवतात आणि नोकरीसाठी आवश्यक कोणतेही व्यावहारिक ज्ञान देत नाहीत.

उच्चशिक्षण नावालाच?जगभरातील विद्यार्थी आता पदवीचा खर्च आणि परतावा यावर विचार करू लागले आहेत. अमेरिकेसह अनेक देशांत उच्चशिक्षणावर विचारविमर्श सुरू आहे. अनेक संस्थांची चौकशी केली जात आहे. भारतातील शिक्षणक्षेत्रातील गुंतागुंत मात्र वाढत चालली आहे.

अर्धे पदवीधर देशात बेरोजगारकाही अंदाजानुसार, भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. येथील सरकार अन्य देशांच्या तुलनेत तरुणांवर अधिक लक्ष देते. गुणवत्ता मूल्यांकन संस्था ‘व्हीबॉक्स’ अभ्यासानुसार, भारतातील एकूण पदवीधरांपैकी सुमारे अर्धे पदवीधर शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींमुळे बेरोजगार आहेत.

टॅग्स :बेरोजगारीफेसबुकनोकरी