Join us

Facebook shares crash: फेसबुकनं एका दिवसात गमावले २०० अब्ज डॉलर्स, भारतावर फोडलं खापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 2:56 PM

फेसबुकसाठी गुरूवारचा दिवस हा खराब होता. कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात झाली २६ टक्क्यांची घसरण.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची (Facebook) पॅरेंट कंपनी मेटाचे (Meta) शेअर्स गुरुवारी 26 टक्क्यांनी घसरले. या घसरणीमुळे मेटा चे मार्केट कॅप 200 अब्ज डॉलर्सने घसरले. एका दिवसात अमेरिकन कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती 31 अब्ज डॉलर्सने कमी झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती आता 89.6 अब्ज डॉलर्स झाली आहे आणि जगातील श्रीमंतांच्या यादीतही त्यांची घरसण झाली आहे.

टिकटॉक (TikTok) आणि यूट्यूबसारख्या (YouTube) प्लॅटफॉर्मवरून कठीण स्पर्धा मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या महसूलावर परिणाम होऊ शकतो, असे मेटाने बुधवारी सांगितले होते. यानंतर बुधवारीही ट्रेडिंगदरम्यान कंपनीचा शेअर 20 टक्क्यांनी घसरला होता, पण नंतर तो सावरला. मात्र गुरुवारी तो 26 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

भारतावर फोडलं खापरकंपनीनं यासाठी भारतातील डेटा किंमतीत झालेल्या वाढीलाही जबाबदार धरलं आहे. भारतात डेटाच्या किमती वाढल्याने डिसेंबर 2021 च्या तिमाहीत त्यांच्या युझर्सची वाढ मर्यादित झाली, असे फेसबुकने म्हटले. भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओने डिसेंबर तिमाहीत त्यांचे दर 18-25 टक्क्यांनी वाढवले ​​होते. "फेसबुकच्या युझर्सच्या संख्येतील वाढीवर अनेक घटकांचा परिणाम झाला आहे. यामध्ये भारतातील डेटा पॅकेजच्या किमतीतील वाढीचाही समावेश आहे," असे मेटाचे चीफ फायनॅन्शिअल ऑफिसर डेव वेनर यांनी सांगितलं.

टिकटॉकचंही आव्हानसध्या कंपनीला टिकटॉक आणि यूट्यूबच्या कठीण आव्हानाचाही सामना करावा लागत आहे. मोठ्या संख्येने युझर्स या प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. याचा आगामी तिमाहीत फेसबुकच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत फेसबुकचे 2.91 अब्ज मंथली अॅक्टिव्ह युझर्स होते आणि मागील तिमाहीच्या तुलनेत या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.

टॅग्स :मार्क झुकेरबर्गफेसबुकभारत