फेसबुक (Facebook) लाँच झाल्यापासून त्याच्या यूझर्सची संख्या सातत्याने वाढत आहे, मात्र बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात फेसबुकला मोठा झटका बसल्याचे सांगण्यात आले आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदाच फेसबुकच्या यूझर्सची संख्या कमी झाली आहे. तसेच, कंपनीच्या जाहिरातीमधून मिळणारा नफाही कमी झाल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
कंपनीचे बाजारमूल्य घटलेफेसबुकने नुकतेच आपले ब्रँडिंगमध्ये बदल करत कंपनीचे मेटा (Meta) असे ठेवले, पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. बुधवारी समोर आलेल्या अहवालानुसार, गेल्या तिमाहीत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या यूझर्सची संख्या सामान्य राहिली. तर, उत्तर अमेरिकेत फेसबुक अॅपच्या दैनिक यूझर्सची संख्या दहा लाखांनी कमी झाली आहे.ही रिपोर्ट समोर आल्यानंतर, कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली असून, मेटाचे बाजार मूल्य $ 200 बिलियनने कमी झाले आहे.
काय आहे कारण?
उत्तर अमेरिकेतून कंपनीला जाहिरातींद्वारे सर्वाधिक कमाई होते. पण, यूझर्सची संख्या घटल्यामुळे फेसबुकच्या जागतिक दैनिक यूझर्सची संख्याही घटली आहे. फेसबुकच्या दैनंदिन यूझर्सची संख्या 1.93 अब्ज वरुन 1.92 अब्जांवर आली आहे. यावरुन तरुणाईची फेसबुकबद्दलची आवड कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मेटाने इन्स्टाग्राम यूझर्सची संख्या अद्याप स्पष्ट केलेली नाही.
कंपनीला मोठा घाटाअलीकडच्या काळात फेसबुकवर प्रायव्हसी आणि इतर कारणांमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत कंपनी कोणतेही ठोस कारण देऊ शकलेली नाही. दुसरीकडे, टिकटॉक सारख्या इतर अॅप्सच्या प्रवेशाचा परिणाम फेसबुकवरही होत आहे. बुधवारी जारी झालेल्या अहवालात कंपनीच्या नफ्यात 10 अब्ज डॉलरची घट होऊ शकते, असे म्हटले आहे. याचे कारण अॅपलचे प्रायव्हसी फीचर आहे. मेटाला गेल्या वर्षी $40 अब्जचा नफा झाला. त्यातील बहुतांश जाहिरातीतून मिळतात, परंतु रिअॅलिटी लॅबमुळे कंपनीचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत आहे.