ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - इंडियन प्रीमियर लिग अर्थात आयपीएलने गेल्या नऊ वर्षात लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आता आयपीएलच्या रेकॉर्डब्रेक लोकप्रियतेची भुरळ फेसबुकलाही पडली असून, आयपीएलचे माध्यम प्रायोजकत्व मिळवण्यासाठी मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील फेसबूकने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर ट्विटर त्याआधीच आयपीएलचे माध्यम प्रायोजकत्व मिळवण्यासाठी उतरली आहे.
फेसबूकने आयपीएलचे टेंडर घेतले असून, स्पर्धेचे डिजिटल राइट्स मिळवण्यासाठी फेसबूक शर्यतीत उतरणार असल्याच्या शक्यतेला बीसीसीआयमधील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. मात्र फेसबूकच्या प्रवक्त्यांकडे याविषयी विचारणा केली असता काहीही बोलण्यास नकार दिला.
गेल्या वर्षभरापासून फेसबूकने क्रीडाक्षेत्रात बऱ्यापैकी रस घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फेसबूकने 'फेसबूक लाइव्ह'वरून प्रीमियर फूटसालचे प्रसारण केले होते. तसेच ऑगस्ट महिन्यात मँचेस्टर युनायटेड आणि एव्हर्टन यांच्यात झालेल्या सामन्याचेही प्रसारण केले होते.
2016 साली झालेल्या आयपीएलच्या नवव्या हंगामात फेसबूकवरून आयपीएलची सर्वाधिक चर्चा झाल्याचे फेसबूकने म्हटले आहे. याकाळात फेसबूकवर आयपीएल संदर्भात 360 दशलक्ष पोस्ट, कॉमेन्ट्स आणि लाईक्स करण्यात आल्याची माहिती फेसबूकने दिली आहे. तसेच या काळात आयपीएलचे 120 दशलक्ष व्हिडिओ आयपीएलवरून पाहण्यात आले. तसेच तब्बल दोन दशलक्ष नव्या फॅन्सनी आयपीएलच्या फेसबूक पेजला अॅड केले.