नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात घर आणि दुकान भाड्याने दिल्यास त्यावर सरकार १२ टक्के जीएसटी आकारणार असल्याचा दावा केला जात आहे. जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत १२ टक्के जीएसटी कराबाबत नियम लागू केला जाईल असं सांगण्यात आले आहे. या दाव्यासोबत व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही फोटो लावण्यात आला आहे.
मात्र आता सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवर विश्वास ठेवू नका. सरकारी प्रेस एजन्सी PIB ने या व्हायरल मेसेजची सत्यता समोर आणली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही असं स्पष्ट केले आहे. जीएसटी कौन्सिलची बैठक वेळोवेळी होत असते. ज्यात जीएसटीबाबत विविध मुद्यांवर चर्चा विनिमय होतात. परंतु सरकार भाड्याच्या घरावर आणि दुकानावर १२ टक्के जीएसटी लावण्याचा विचार करत असल्याचे कुठलेही संकेत दिले नाहीत. जीएसटी बैठकीत अनेकदा बदल करण्याचे निर्णय घेतले जातात.
अनेकदा जीएसटी कौन्सिल बैठकीपूर्वी बऱ्याच अफवा पसरवणारे मेसेज व्हायरल होत असतात. आता भाड्याने घर आणि दुकान दिल्यास १२ टक्के जीएसटी आकारणार याची भर पडली आहे. व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे घरमालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे ही चिंता दूर करण्यासाठी सरकारने या मेसेजवर स्पष्टीकरण दिले आहे. १२ टक्के जीएसटी लावण्याची कुठलीही योजना नाही. सरकारी पातळीवर असा विचार नाही. हा मेसेज पूर्णपणे चुकीचा आणि लोकांमध्ये संभ्रम पसरवणारा आहे. पीआयबीने अशाप्रकारे व्हायरल करणाऱ्या फोटोमधून लोकांची दिशाभूल होते. त्यामुळे ते शेअर करू नका असा सल्ला दिला आहे.
काय आहे जीएसटी नियम?
घरावर जीएसटी तेव्हाच लागतो जेव्हा त्याचा व्यावसायिक वापरासाठी भाड्यावर दिला जातो. जितका कॉमर्शियल स्पेस भाड्यावर दिला आहे. त्यावर १८ टक्के हिशोबाने जीएसटी लागतो. टॅक्सेबल व्हॅल्यूवर १८ टक्के कर लागतो.