Join us

कारखाने जोरात, नोकऱ्या कोमात; उत्पादनाचा आलेख चढला पण रोजगाराचा मात्र घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 11:06 AM

राॅयटर्स पोलमध्ये ऑगस्टमधील पीएमआय घसरून ५७.५ वर जाईल, असे म्हटले होते. तथापि, हा अंदाज भारतीय वस्तू उत्पादन क्षेत्राने खोटा ठरवून उत्तम कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली : ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे कारखाना उत्पादन वाढून तीन महिन्यांच्या उच्चांकावर गेले. रोजगारनिर्मिती मात्र घटून ४ महिन्यांच्या नीचांकावर गेली. ‘एस ॲण्ड पी ग्लोबल’ने जारी केलेल्या वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राच्या ‘खरेदी व्यवस्थापक निर्देशांका’तून (पीएमआय) ही माहिती समोर आली आहे. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा ऑगस्टमधील पीएमआय ५८.६ राहिला. जुलैमध्ये तो ५७.७ होता. राॅयटर्स पोलमध्ये ऑगस्टमधील पीएमआय घसरून ५७.५ वर जाईल, असे म्हटले होते. तथापि, हा अंदाज भारतीय वस्तू उत्पादन क्षेत्राने खोटा ठरवून उत्तम कामगिरी केली आहे.

पीएमआय २६ महिने ५० हून अधिक वस्तू उत्पादन क्षेत्राचा पीएमआय मागील २६ महिन्यांपासून म्हणजेच मार्च २०२० पासून ५०च्या वर आहे. कोविड-१९ साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका मार्च २०२० मध्ये पीएमआयला बसला होता. ज्ञात असावे की, ५०च्या वरील पीएमआय हा वृद्धी, तर ५०च्या खालील पीएमआय घसरण दर्शवितो. 

एप्रिलनंतर मिळाले सर्वात कमी रोजगारचालू वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक वृद्धी मजबूत राहील हे नवीन ऑर्डर आणि उत्पादनातील वाढीतून दिसून येत आहे. नवीन ऑर्डर आणि उत्पादनात अनुक्रमे जानेवारी २०२१ आणि ऑक्टोबर २०२० नंतरची सर्वाधिक गतिमान वृद्धी दिसून आली आहे. निर्यात वृद्धीनेही १० महिन्यांचा उच्चांक केला आहे. त्यातून रोजगारनिर्मितीला मात्र गती मिळू शकलेली नाही. रोजगारनिर्मिती सलग पाचव्या महिन्यात सकारात्मक राहिली असली तरी एप्रिलनंतरची सर्वाधिक कमी रोजगार वृद्धी ऑगस्टमध्ये दिसून आली आहे.

टॅग्स :व्यवसाय