लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाच विविध कारखान्यांमध्ये वस्तुंचे उत्पादन वाढले असून त्यामुळे कंपन्यांच्या वार्षिक आधारावरील विक्रीत वित्त वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. कोविड-१९ साथीमुळे २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीचा सूचीबद्ध कंपन्यांंचा वित्तीय निकाल सादर करण्याची मुदत सेबीने ३० जूनपर्यंत वाढवली होती. २,६०८१ बिगर-सरकारी व बिगर-वित्तीय सूचीबद्ध कंपन्यांनी सादर केलेल्या तिमाही कामगिरीतून उत्साहवर्धक आकडेवारी हाती आली आहे. १,६३३ वस्तू उत्पादन कंपन्यांची विक्री ३१ टक्क्यांनी वाढली आहे. आदल्या तिमाहीत ही वाढ ७.४ टक्के इतकी होती. विक्रीतील वाढ व्यापक आहे.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, वस्तू उत्पादन क्षेत्राच्या तुलनेत आयटी क्षेत्रातील वाढ कमी म्हणजेच ६.४ टक्के राहिली. वस्तू उत्पादन कंपन्यांनी कच्च्या मालावरील खर्च वाढविला. त्यांचा कर्मचाऱ्यांवरील खर्चही वाढला. आयटी कंपन्यांच्या बाबतीत तो स्थिर राहिला. बिगर-आयटी कंपन्यांची कर्मचारी वृद्धी घसरल्याचे दिसून आले.
खर्चाच्या तुलनेत विक्रीमध्ये झाली वाढ
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत वस्तू उत्पादन कंपन्यांचा नफा वाढला. खर्चाच्या तुलनेत विक्रीत वाढ झाल्यामुळे नफ्यात वाढ झाली आहे. सेवा क्षेत्रातील आयटी आणि बिगर-आयटी कंपन्यांचा नफाही वाढला आहे. स्थानिक निर्बंध याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असला तरीही वस्तू उत्पादन कंपन्या चांगली कामगिरी करीत आहेत.