नवी दिल्ली : करप्रणाली नागरिकांसाठी ‘फ्रेंडली’ करण्यासाठी ‘सीबीडीटी’ने (सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेस) पुढाकार घेतला आहे. लवकरच प्राप्तिकर ‘रिटर्न्स’चे अगोदरपासूनच भरलेले अर्ज उपलब्ध करुन देण्यात येतील. ‘सीआयआय’च्या (कॉन्फडेरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री) कार्यक्रमात ‘सीबीडीटी’चे चेअरमन सुशील चंद्रा यांनी याबाबत वक्तव्य केले.अगोदरच भरलेल्या या अर्जांमध्ये वैयक्तिक आणि मिळकतीची नोंद असेल. यामुळे करदात्यांचा वेळ वाचेल. या प्रणालीनुसार वर्षाला जाहीर केलेले उत्पन्न पाच लाखांपर्यंत असणाऱ्या करदात्यांना केवळ एका पानाचा अर्जच भरावा लागणार आहे. ‘रिटर्न्स’ भरण्याचा ‘विंडो पीरियड’ दोन महिन्यांपासून सात दिवसांवर आणण्याचादेखील प्रयत्न सुरू आहेत.केवळ चार तासांतच ‘पॅन कार्ड’ उपलब्ध करुन देण्याबाबतदेखील प्रयत्न सुरू असल्याचे चंद्रा यांनी सांगितले. करांचे ‘प्री-पेमेंट’, ‘रिटर्न्स’ भरणे, परतावा इत्यादी प्रक्रियात ‘डाटा अॅनालिटिक्स’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे करदात्यांना ‘रिटर्न्स’ सुलभतेने भरता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. कर चुकविणाºयांची केवळ ०.५ टक्के प्रकरणे पुढील तपासासाठी पाठविण्यात आली आहेत, तर ७० हजार प्रकरणे ‘आॅनलाइन’ निकाली काढण्यात आली आहेत. तपासणीची मर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
प्राप्तिकर ‘रिटर्न्स’ भरणे होणार सुलभ, करदात्यांचा वेळ वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 4:40 AM