भारताचे आर्थिक यश मागील वर्षांत करण्यात आलेल्या सुधारणांवर आधारित आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी केले. २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे लक्ष्य भारत प्राप्त करेल, असेही जॉर्जिव्हा यांनी सांगितले.
जॉर्जिव्हा यांनी गुरुवारी येथे पत्रकारांच्या एका समूहासोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान उच्च राहिले आहे. ही परंपरा आताही सुरू आहे. २०२४ साठी आम्ही भारताचा वृद्धी दर अंदाज वाढवून ६.५ टक्के करीत आहोत. २०२३ मध्ये मजबूत कामगिरीच्या बळावर असे केले जात आहे. भारताचे यश आधीच्या वर्षांतील सुधारणांवर आधारित आहे.
रोखीच्या समस्येवर तोडगा, पाकिस्तानला सुनावले
■ पाकिस्तान सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेतील गंभीर संरचनात्मक समस्यांवर उपाययोजना करायला हव्यात, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचे कान टोचले आहेत.■ नाणेनिधीने जारी करण्यात आलेल्या 'जागतिक आर्थिक स्थिती या ताज्या अहवालात ही समज पाकिस्तानला देण्यात आली आहे.रोखीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढून देशाला क्षमतांपर्यंत नेणे आवश्यक असल्याचा सल्लाही नाणेनिधीने पाकला दिला आहे.■ पाकिस्तानचा वृद्धीदर अंदाज घटवून २ टक्के केल्यानंतर नाणेनिधीने हे वक्तव्य केले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये पाकचा वृद्धी दर अंदाज २.५ टक्के होता. त्यात नाणेनिधीने अर्धा टक्का कपात केली
डिजिटलायझेशनचा सर्वाधिक फायदा
जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, भारताला डिजिटलायझेशनचा सर्वाधिक फायदा झाला. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभ्या केल्या. त्यामुळे एक मजबूत ताकद बनण्यास भारताला मदत झाली. आता छोटे व्यावसायिकही बाजारात प्रवेश कर शकत आहेत. पूर्वी हे शक्य नव्हते. इ.स. २०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यास १०० वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत भारतास विकसित राष्ट्र बनविण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासंबंधीच्या प्रश्नावर जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, मला यात अशक्य असे काहीच वाटत नाही.