नवी दिल्ली : तुमच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या खऱ्या आहेत की नाही हे नक्की तपासा. कारण, सरकारने संसदेत सांगितले आहे की 2018 ते 2020 दरम्यान जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी माहिती दिली आहे की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2020 दरम्यान जप्त केलेल्या बनावट नोटांची संख्या वाढली आहे.
2016 ते 2020 दरम्यान जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये 2016 मध्ये 2,000 रुपयांच्या फक्त 2,272 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या, 2017 मध्ये ही संख्या 74,898 वर पोहोचली होती, 2018 मध्ये ही संख्या 54,776 वर आली आहे. पण 2019 मध्ये पुन्हा ही संख्या 90,556 पर्यंत वाढली आणि 2020 मध्ये एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2,000 रुपयांच्या एकूण 2,44,834 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरच्या कालावधीची माहिती देण्यात आलेली नाही. सरकारने संसदेत सांगितले की, बँकिंग सिस्टिममध्ये जप्त करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2018-19 ते 2020-21 पर्यंत कमी झाली आहे. 2021-22 मध्ये बँकिंग सिस्टिममध्ये एकूण 13,604 बनावट 2,000 रुपयांच्या नोटांची ओळख पटली, जी चलनात असलेल्या एकूण 2,000 रुपयांच्या नोटांच्या 0.000635 टक्के आहे.
वित्त राज्यमंत्री म्हणाले की, बनावट नोटांचे चलन रोखण्यासाठी हायक्वालिटी नेक इंडियन करन्सी नोट्सच्या तपासणीसाठी एनआयएला नोडल एजन्सी बनवण्यात आली आहे. तसेच, FICN कोर्डिनेशन ग्रुप (FCORD) राज्यांच्या सुरक्षा एजन्सी आणि केंद्र सरकार यांच्यात गुप्त माहिती शेअर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याशिवाय एनआयएमध्ये टेटर फंडिंग आणि फेक करन्सी सेलची स्थापना करण्यात आली आहे, जी टेटर फंडिंग आणि बनावट नोटांच्या प्रकरणांची चौकशी करते. तसेच, ते म्हणाले की, भारत आणि बांगलादेश यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि बनावट नोटांची तस्करी करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी एक संयुक्त टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे.
आरबीआयचा अहवाल
यापूर्वी, 2020-21 च्या तुलनेत 2021-22 मध्ये देशात बनावट नोटांच्या संख्येत 10.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये 500 रुपयांच्या 101.9 टक्के अधिक बनावट नोटा सापडल्या आहेत. त्याचवेळी 2000 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 54.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात असेही म्हटले होते. दरम्यान, बनावट नोटांमुळे देशाची आर्थिक रचना कमकुवत होते. यामुळे बँकिंग व्यवस्थेतील रोखीचा प्रवाह वाढल्याने महागाई देखील वाढते. बनावट नोटांमुळे देशात अवैध व्यवहार वाढतात कारण अशा व्यवहारांमध्ये कायदेशीर चलन वापरले जात नाही.