Join us  

सेवा क्षेत्राच्या वृद्धीदरात पुन्हा घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2016 2:45 AM

भारताच्या सेवा क्षेत्राचा वृद्धीदर सलग दुसऱ्या महिन्यात घसरला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरनंतर त्यात फारच थोडी वाढ झाली आहे

नवी दिल्ली : भारताच्या सेवा क्षेत्राचा वृद्धीदर सलग दुसऱ्या महिन्यात घसरला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरनंतर त्यात फारच थोडी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर धोरणात्मक व्याजदरात कपात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर दबाव राहणार आहे. सेवा क्षेत्रातील वाढीची नोंद घेणारा निक्केई सेवा निर्देशांक मे महिन्यात घसरून ५१.0 राहिला. एप्रिलमध्ये तो ५३.७ होता. यावरून सेवा क्षेत्रातील हालचाली मंदावल्याचे दिसून येते. सेवा क्षेत्र नोव्हेंबरनंतर सर्वाधिक कमजोर स्थितीत असल्याचे यातून दिसून येते. हा निर्देशांक ५0च्या वर राहिल्यास वृद्धी झाल्याचे मानले जाते. याशिवाय वस्तू उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांची हालचाल दर्शविणारा निक्केई इंडिया कंपोजिट पीएमआय उत्पादन निर्देशांक मे महिन्यात ५0.९ वर राहिला. हा गेल्या सहा महिन्यांतील नीचांक आहे. एप्रिलमध्ये तो ५२.८ वर होता. या सर्वेक्षणाचे संचालन करणारी संस्था ‘मार्किट’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी म्हटले की, पीएमआयच्या ताज्या आकड्यांमुळे आर्थिक आणि पतविषयक धोरणांच्या परिणामाबाबत संशय निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांत कपात केली जाण्याची शक्यताही त्यामुळे वाढली आहे.