- प्रसाद गो. जोशी
जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या अस्थिर वातावरणाबरोबरच देशामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे बाजाराला चिंता वाटत असून त्यामुळेच बाजारावर काहीसे मंदीचे मळभ दाटून आलेले दिसत आहे. परिणामी देशातील शेअर बाजार सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये मोठ्या प्रमाणात खाली आला.
मुंबई शेअर बाजारात सप्ताहाचा प्रारंभ काहीसा नरमीच्या वातावरणामध्ये झाला असला तरी पूर्वार्धामध्ये निर्देशांकांमध्ये वाढ झालेली दिसून आली. मात्र जसजशी देशातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली लॉकडाऊनची भीती वाढीस लागल्याने गुंतवणूकदारांनी नफा कमविण्याला प्राधान्य दिले. परिणामी बाजारावर विक्रीचा दबाव येऊन दर कमी झाले. त्यातच एफ ॲण्ड ओच्या सौदापूर्तीला बाजारावर विक्रीचा दबाव वाढून बाजार मोठ्या प्रमाणात खाली आला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बाजार वाढला. मात्र आधी झालेल्या घसरणीमुळे सप्ताहात बाजार लाल रंगामध्येच राहिला.
सात कंपन्यांच्या भांडवल मूल्यामध्ये घट
nबाजारात झालेल्या घसरणीमुळे पहिल्या १० पैकी ७ कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये १.०७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
nया १० कंपन्यांपैकी केवळ टीसीएस, एच यू एल आणि एचडी एफसी या तीनच कंपन्यांचे भांडवल वाढले आहे.
nभांडवल मूल्यामधील घटीचा सर्वात मोठा फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला असून तिचे भांडवल ५५,५६५.२१ कोटी रुपयांनी घटले आहे. यापाठोपाठ बजाज फायनान्स आणि भारतीय स्टेट बँकेचा क्रमांक लागला आहे. एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये सर्वात कमी घट झाली आहे.
घडामोडींवर लक्ष
आगामी सप्ताहामध्ये कोरोनाबाबतची स्थिती हीच बाजाराच्या चिंतेचा विषय ठरू शकते. याशिवाय जगभरातील बाजारांमध्ये घडणाऱ्या घडामोडी बाजाराला दिशा देऊ शकतील. नवीन महिन्याचा प्रारंभ होत असल्याने वाहन विक्री व अन्य आकडेवारी जाहीर झाल्यास त्यानुसार बाजारात परिणाम दिसू शकतात. विशेष म्हणजे दोन दिवस बाजाराला सुटी असल्याने आगामी सप्ताह छोटा असेल.