Join us  

गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्याने घसरण; दुसरी लाट येण्याच्या भीतीनं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 6:21 AM

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ घसरणीने झाला. त्यानंतर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५०,८५७ ते ४८,५८६ अंशांदरम्यान खाली वर होत होता

प्रसाद गो. जोशीअमेरिकेमधील बॉण्डस‌वरील वाढलेला परतावा आणि गुंतवणूकदारांकडून नफा कमविण्यासाठी होत असलेली विक्री, महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती यामुळे शेअर बाजारामध्ये मंदीचे वातावरण दिसून आले. त्यामुळेच गेल्या सप्ताहातील पहिले चार दिवस शेअर बाजारामध्ये घसरण झाली. सप्ताहाचा समारोप वाढीने झाला, ही त्यामधील समाधानाची बाब होय.

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ घसरणीने झाला. त्यानंतर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५०,८५७ ते ४८,५८६ अंशांदरम्यान खाली वर होत होता. मात्र अखेरच्या दिवशी झालेल्या खरेदीमुळे बाजारातील घसरण काहीशी भरून आली. मात्र बाजाराचा मूड हा आजही विक्रीचाच असल्याचे दिसत आहे. कोरोनाची लस आल्यामुळे बाजाराला काहीसा दिलासा मिळत असतानाच दुसरी लाट येण्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदार चिंतेमध्ये आहेत. 

८ कंपन्यांच्या भांडवलामध्ये घटमुंबई शेअर बाजारातील पहिल्या १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये सप्ताहाच्या अखेरीस १.३८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला आहे. मात्र टीसीएस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या भांडवल मूल्यामध्ये वाढ झाली आहे. 

परकीय वित्तसंस्थांची मोठी खरेदी

  • परकीय वित्तसस्थांकडून मार्च महिन्यामध्ये शेअर बाजारात चांगल्या प्रकारे रक्कम गुंतविली गेली आहे. 
  • मार्च महिन्याच्या १९ दिवसांमध्ये या संस्थांनी ८६४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परकीय वित्तसंस्थांनी समभागांमध्ये १४,२०२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 
  • बॉण्डसमधील गुंतवणूक या संस्था काढून घेत असल्याचे दिसून आले आहे. या संस्थांनी बॉण्डसमधून ५५६० कोटी रुपये काढून घेतले 
  • आहेत. 
  • याआधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये परकीय वित्तसंस्थांनी मोठी गुंतवणूक केली आहे. 
टॅग्स :शेअर बाजार