शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीगेले चार सप्ताह सातत्याने वाढत असलेल्या सेन्सेक्सने नवीन उच्चांक नोंदविल्यानंतर घसरण अनुभवली आणि वाढीला ब्रेक लागला. मात्र निफ्टी अद्यापही सुसाट असून नवीन उच्चांक नोंदवित तो वाढतोच आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून झालेली निराशा, अमेरिका आणि इंग्लंडमधील राजकीय अस्थैर्य, चार अरब राष्ट्रांनी कतारशी तोडलेले संबंध आणि परकीय वित्तसंस्थांची विक्री याचा बाजारावर विपरीत परिणाम झाला.मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकांच्या वाढीला नवीन उच्चांकी पातळी गाठल्यावर ब्रेक लागला आहे. संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या प्रारंभी काहीसा वाढीव पातळीवर सुरू होऊन त्याने ३१४३०.३२ अंशांचा नवा उच्चांक गाठला. त्यानंतर त्यामध्ये घसरण झाली. सप्ताहाच्या उत्तरार्धात तो काहीसा सावरला तरी त्यामध्ये ११.२३ अंशांनी घट होऊन तो ३१२६२.०६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सुसाट वेगात आहे. ९७०० अंशांची पातळी ओलांडल्यानंतर तो काहीसा खाली आला असला तरी मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा १४.७५ अंश वाढून ९६७५.२५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली. बाजारामध्ये गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्था तसेच पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा कमविण्याचे धोरण स्वीकारले. रिझर्व्ह बॅँकेने व्याजदर कपातीला नकार देऊन बाजाराच्या अपेक्षांवर पाणी ओतले. त्यातच जागतिक राजकीय तसेच आर्थिक परिस्थितीची चिंता वाटत असल्याने बाजारावर विक्रीचे दडपण आले. अमेरिकेच्या अध्यक्षांविरोधात महाभियोग आणण्याच्या हालचाली, इंग्लंडच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान तेरेसा मे यांच्या पक्षाचे हुकलेले बहुमत आणि चार अरब देशांनी कतार या संपन्न देशाशी तोडलेले संबंध अशा आंतरराष्ट्रीय परिस्थितीने जगभरातील शेअर बाजार मंदीत होते. भारताचा जीडीपी घसरण्याची चिंताही व्यक्त करण्यात आली. देशात ९८ टक्के पाऊस पडण्याच्या अंदाजाने मात्र आशेचा किरण दिसला.
नवीन उच्चांकानंतर घसरण; निफ्टी सुसाट
By admin | Published: June 12, 2017 12:14 AM