लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विकसित आणि विकसनशील देशांच्या चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत स्थितीत आहे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी केले.
भारतीय चलनाने प्रति डॉलर ८० रुपयांची पातळी काही दिवसांपूर्वीच ओलांडली असताना, दास यांनी हे वक्तव्य केले आहे. दास यांनी सांगितले की, रुपयातील तेज चढ-उतार रिझर्व्ह बँक अजिबात सहन करणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या उपाययोजनांनी रुपयांचे व्यवहार सुलभ होण्यास मदत मिळाली आहे.
दास यांनी म्हटले की, महागाईचे उद्दिष्ट ठरविण्यासाठी २०१६ मध्ये स्वीकारण्यात आलेल्या सध्याच्या आराखड्याने खूप चांगले काम केले आहे. अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्राच्या हितासाठी ही व्यवस्था सुरू राहायला हवी.
रुपयाची घसरण झाल्यामुळे आयटी कंपन्या आणि निर्यातदार यांना लाभ होतो. तथापि, त्याचवेळी आयात महागते. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत महागाईही वाढते. देशाच्या चालू खात्यातील तूटही (कॅड) वाढते. निर्यातीपेक्षा आयात जास्त झाल्यानंतर जी व्यापारी तूट निर्माण होते, त्यास ‘कॅड’ म्हटले जाते.
घाबरण्याची गरज आहे का?
- दास यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक बाजारात डॉलरचा पुरवठा करीत आहे. बाजारात पुरेशा प्रमाणात रोख रक्कम (गंगाजळी) राहील, याची खबरदारी घेतली जात आहे.
- रुपयासाठी कोणत्याही पातळीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले नाही. विदेशी चलनाच्या अप्रतिबंधित उसणवाऱ्यांमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही.
- सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या अशाप्रकारचे व्यवहार मोठ्या संख्येने करीत आहेत. गरज पडल्यास सरकार त्यात हस्तक्षेप करील, तसेच मदतही करील.