लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (LIC) IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना सध्या रोजच्या रोज तोटा सहन करावा लागत आहे. यातच आता सरकारकडून एक महत्त्वपूर्ण विधान करण्यात आले आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या घसरणीसंदर्भात सरकार चिंतित असल्याचे, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी म्हटले आहे.
पांडेय म्हणाले, ही घसरण तात्पूरती आहे. त्यांच्या मते, एलआयसीचे व्यवस्थापन या सर्व पैलूंवर विचार करून शेअरधारकांसाठी मूल्य वाढवेल. महत्वाचे म्हणजे, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) शेअर 17 मे रोजी 872 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाला होता. सरकारने एलआयसीच्या शेअरची इश्यू प्राइस 949 रुपये प्रति शेअर एवढी निश्चित केली होती.
इश्यू प्राइसच्याही खाली आहे शेअर - एलआयसीचा शेअर लिस्ट झाल्यापासूनच इश्यू प्राइसपेक्षा खालच्या पातळीवर आहे. या कालावधीत हा शेअर 708.70 रुपयांच्या नीचांकी, तर 920 रुपये प्रति शेअर, अशा उच्च पातळीवर गेला आहे. शुक्रवारी बीएसईवर एलआयसीचा शेअर 709.70 रुपये प्रति शेअरवर बंद झाला.
लिस्ट झाल्यापासून एलआयसीचे मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांवरून 4.48 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीत LIC च्या गुंतवणूकदारांना 1.52 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.