मुंबई : उतरलेला महागाईचा दर आणि कारखाना उत्पादनात झालेली वाढ यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात केली जाण्याची शक्यता वाढलेली असतानाही मंगळवारी शेअर बाजार घसरले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५0 अंकांनी घसरून २५,७0५.९३ अंकांवर बंद झाला. भारत सरकारने काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर आॅगस्टमध्ये ३.६६ टक्क्यांवर आला आहे. हा नवा नीचांक ठरला आहे. ठोक क्षेत्रातील महागाईचा दर उणे ४.९५ टक्क्यांवर आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरांत कपात केली जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक येत्या २९ सप्टेंबर रोजी पतधोरणाचा आढावा घेणार आहे. तथापि, त्यापेक्षा अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत काय निर्णय घेतो याकडे आता बाजाराचे सर्वाधिक लक्ष लागले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारापासून दूर राहणेच पसंत केले.फेडरल रिझर्व्हची दोन दिवसीय बैठक बुधवारी सुरू होत आहे. चीनमधील मोठ्या घसरणीचाही बाजारांवर परिणाम दिसून आला. चीनमधील आर्थिक संकटामुळे शांघाय कंपोजिट ३ हजार अंकांच्या खाली आला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स दिवसभर अस्थिर होता. सत्राच्या अखेरीस तो १५0.७७ अंकांनी अथवा 0.५८ टक्क्यांनी घसरून २५,७0५.९३ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स २४९.४९ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४३.१५ अंकांनी अथवा 0.५५ टक्क्यांनी घसरून ७,८२९.१0 अंकांवर बंद झाला. निफ्टीही दिवसभर अस्थिरच होता.सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक ५.0८ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल वेदांताचा समभाग ४.0६ टक्के घसरला. धातू, भांडवली वस्तू, टिकाऊ ग्राहकवस्तू, वाहन आणि बँकिंग या क्षेत्रांत विक्रीचा जोरात मारा झाला.
शेअर बाजारात घसरण!
By admin | Published: September 16, 2015 2:15 AM