प्रसाद गो. जोशी
एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये झालेली वाढ आणि अमेरिकन अध्यक्षांच्या काँग्रेसमधील भाषणाचा अनुकूल परिणाम बाजारावर होऊन निर्देशांकाने दोन वर्षांतील उच्चांकी झेप घेतली. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफा कमाविण्यासाठी विक्री केल्याने सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक खाली आले. परिणामी सहा सप्ताहांपासून निर्देशांकाच्या सुरू असलेल्या चढत्या भाजणीला ब्रेक लागला.
मुंबई शेअर बाजार गतसप्ताहात वाढीव पातळीवर सुरू झाला. त्यानंतर सकारात्मक वातावरणामुळे बाजाराने २९१३३ अंश अशी दोन वर्षांतील उच्चांकी झेप घेतली. त्यानंतर मात्र गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत विक्री करून नफा कमाविण्याचे धोरण स्वीकारल्याने निर्देशांक खाली आले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस ०.२ टक्के म्हणजेच ६०.५२ अंशांनी घसरून २८८३२.४५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक २.२० अंशांनी कमी होऊन ८८९७.५५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकही घसरले.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर ७ टक्के राहिला. नोटाबंदीमुळे उत्पादन घसरल्याच्या होत असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर बाजाराने याचे स्वागत केले. मागील तिमाहीपेक्षा ०.४ टक्क्यांनी हा दर घसरला असला तरी वर्षाचा विचार करता जीडीपीचा प्रस्तावित दर ७.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पीएमआयमध्येही थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे उत्पादन तसेच सेवा क्षेत्रामध्ये व्यवसायवृद्धी होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकन अध्यक्षांनी काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणाचा बाजारावर चांगला परिणाम दिसला.
आगामी सप्ताहात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होत असून, त्यामध्ये व्याजदर वाढविले जाण्याचे स्पष्ट संकेत दिले गेले आहेत. या बातमीचे पडसाद येत्या सप्ताहात बाजारात उमटलेले दिसून येतील. यामुळे परकीय वित्तसंस्था सावधपणे व्यवहार करतील.
>म्युच्युअल फंडांनी गुंतविले दोन हजार कोटी
भारतीय शेअर बाजारात फेब्रुवारी महिन्यात विविध म्युच्युअल फंडांनी दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. सलग सातव्या महिन्यात म्युच्युअल फंडांची बाजारातील ही वाढती गुंतवणूक आहे.
आॅगस्ट २०१६ पासून म्युच्युअल फंडांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक सुरू केली आहे. या काळामध्ये त्यांनी सुमारे ४६ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेअर बाजारामध्ये ओतली आहे.
फेब्रुवारी महिन्यात विविध म्युच्युअल फंडांनी ३८ हजार ८३० कोटी रुपये रोख्यांमध्ये गुंतविले असल्याचे भारतीय रोखे विनिमय मंडळ (सेबी)ने जाहीर केले आहे. शेअर बाजार खाली असताना सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंडांकडून गुंतवणूक केली जाते. मात्र गेले सहा महिने परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने विक्री केली जात असल्याचा फायदा म्युच्युअल फंडांनी घेतलेला दिसतो. करबचतीच्या विविध योजनांसाठी म्युच्युअल फंडांकडे डिसेंबरपासून रक्कम जमा होत असते.
उच्चांकानंतर बाजारात सुरू झाली घसरण
काँग्रेसमधील भाषणाचा अनुकूल परिणाम बाजारावर होऊन निर्देशांकाने दोन वर्षांतील उच्चांकी झेप घेतली
By admin | Published: March 6, 2017 04:25 AM2017-03-06T04:25:08+5:302017-03-06T04:25:08+5:30