- पुष्कर कुलकर्णी
संसाराचा गाडा हाकताना किती अपत्यं हवी याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यकच असते. कारण मुलांचे संगोपन, योग्य आहार, शिक्षण आणि उच्च शिक्षण यास लाखो रुपयांचा खर्च येतो, याचा व्यावहारिक विचार फार कमी जोडपी करताना दिसतात...
भ्रामक संकल्पना- मुले ही देवाघरची फुले- वंशाला मुलगा हवाच- मुलगी तर परक्या घरची - मुलाशिवाय मुक्ती नाही
1. या अव्यावहारिक संकल्पनांमुळे पाळणा सतत हलत ठेवणारी बरीच जोडपी असतात. घरातील ज्येष्ठ मंडळीही या विचारांत भर घालत असतात. त्यांना भविष्यातील अपेक्षित खर्च किती असेल याची कल्पनाच नसते आणि मग आर्थिक नियोजनाच्या अभावाने जीवनाचा खरा आनंद हिरावून घेतला जातो आणि ऋणात सण साजरे करावे लागतात.
2. अपत्य किती आणि आपल्या कोणत्या वयात जन्माला घालावीत याचे नियोजन प्रत्येक जोडप्याने करावे. कारण यातच खरी अर्थनीती दडली आहे.
हे लक्षात घ्या आणि विचार करा- योग्य आहार आणि संगोपन यावरचा प्रत्येक मुलावर होणारा खर्च- बालवाडी ते उच्च शिक्षण यावरील खर्च आणि तो करण्याची आपली आर्थिक ताकद- मुलांच्या इतर गरजा जसे खेळ, व्यायाम, छंद जोपासणे आणि पर्सनल गॅझेट्स यावरील अपेक्षित खर्च
- घरातील आर्थिक उत्पनाचा स्रोत जसे नवरा - बायको दोघेही नोकरी करतात की फक्त एकाच्या उत्पन्नावर घर अवलंबून आहे? घरात ज्येष्ठ व्यक्ती किती? आणि त्यांचे आरोग्य कसे आणि त्यावर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी किती? अंगावर लोन किती? त्याची परतफेड किती वर्षांची आहे? आपले सध्याचे वय किती? किती वर्षे नोकरी करू शकतो? हे सर्व मुद्दे कागदावर मांडा.
- उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घाला आणि मग आपल्याला किती अपत्ये योग्य पद्धतीने वाढविता येतील याचा विचार करा. अन्यथा सुखाचा संसार भविष्यात दुःखी करण्यास आपणच जबाबदार असणार आहात. पाहा जमतीय का ही अर्थनीती.