मुंबई : शेअर बाजारात गेल्या तीन सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३ अंकांनी घसरून २४,४६९.५७ अंकांवर बंद झाला. इंजिनिअरिंग, बँकिंग, आॅटो आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत विक्री झाल्यामुळे निर्देशांकाला फटका बसला.जानेवारीमधील डेरिव्हेटिव्ह सौदे पूर्ण करण्यासाठी शेवटचा दिवस असल्यामुळे बाजारात विक्रीचा जोर होता. तसेच कंपन्यांच्या तिमाही निकालाबाबतही फारशी उत्सावर्धक स्थिती बाजारात नव्हती. याचा परिणाम सेन्सेक्सवर झाला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी नरमाईनेच उघडला होता. नंतर तो त्यातून बाहेरच पडू शकला नाही. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स २२.८२ अंकांनी अथवा 0.0९ टक्क्यांनी घसरला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स ५३0.१८ अंकांनी वाढला होता. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३.१0 अंकांनी अथवा 0.१८ टक्क्यांनी घसरून ७,४२४.६५ अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारांतही घसरणीचा कल दिसून आला. चीनचा शांघाय कंपोजिट २.९२ टक्क्यांनी घसरला. वास्तविक चीनच्या सेंट्रल बँकेने बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा ओतल्यानंतरही निर्देशांक घसरला. जपानच्या टोकिओ बाजाराचा निर्देशांक निक्केई 0.७१ टक्क्यांनी खाली आला. हाँगकाँगचा हँग सेंग मात्र 0.७५ टक्क्यांनी वर चढला. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १६ कंपन्यांचे समभाग घसरले. १४ कंपन्यांचे समभाग वाढले. व्यापक बाजारातही घसरणीचा जोर राहिला. बीएसई मीडकॅप 0.३६ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप 0.0४ टक्क्यांनी खाली आला. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई कॅपिटल गुडस् निर्देशांक सर्वाधिक १.७२ टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल बँकिंग, कंझुमर ड्युरेबल्स आणि आॅटो या क्षेत्रांचे निर्देशांक घसरले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी ३६६.९३ कोटी रुपयांचे समभाग विकले. (वृत्तसंस्था)
तेजीला ब्रेक; सेन्सेक्स २३ अंकांनी घसरला
By admin | Published: January 29, 2016 3:46 AM